सोहम नाईक विरोधात दोन आरोपपत्रे दाखल
पणजी : कुडचडे येथील वासनाकांड प्रकरणी सोहम नाईक याच्या विरोधात गुन्हा शाखेने दोन आरोपपत्रे दाखल केली आहेत. त्याचबरोबर सर्वांत आधीच्या एफआयआरमध्ये तिसरे आरोपपत्रही लवकरच दाखल होण्याची शक्यता आहे. गुन्हा शाखा फॉरेन्सिक आणि वैद्यकीय पुराव्यांवर मोठ्या प्रमाणावर अवलंबून राहिली आहे, ज्यात जप्त केलेल्या मोबाईलमधील डिलीट केलेले व्हिडिओ, फोटो आणि मोबाईल डेटा यांचा समावेश आहे. एका प्रकरणात, गुन्हा शाखेने बाल न्याय मंडळासमोर (जेजेबी) 158 पानांचा अहवाल दाखल केला असून, त्यात 19 साक्षीदारांची नावे आहेत.
सूत्रांनी सांगितले की, कथित गुह्याच्यावेळी आरोपी आणि पीडित दोघेही अल्पवयीन होते, म्हणून हे आरोपपत्र नियमित आरोपपत्राऐवजी बाल न्याय अहवालाच्या स्वरूपात दाखल करण्यात आले आहे. पीडित मुलगी इयत्ता दहावीत शिकत होती, तेव्हा ती सोशल मीडियाद्वारे सोहमच्या संपर्कात आली. त्या दोघांमध्ये कथितरित्या मैत्री झाली, ज्यानंतर नाईकवर तिचे लैंगिक शोषण केल्याचा आणि त्या अश्लील कृत्याचे चित्रीकरण केल्याचा आरोप आहे. वैद्यकीय पुराव्यांनी लैंगिक अत्याचाराचा दुजोरा मिळाला आहे.
गुन्हा शाखेने वेर्णा येथील न्यायवैद्यक विज्ञान प्रयोगशाळेत तपासणीनंतर जप्त केलेले मोबाईल न्यायवैद्यक पुरावे देखील जोडले आहेत. सोहम त्यावेळी अल्पवयीन असल्याने, हे प्रकरण ‘अपना घर’ येथील बाल न्याय मंचासमोर सुरू ठेवावे की नियमित न्यायालयात हस्तांतरित करावे, याचा निर्णय आता जेजेबी घेईल. दुसऱ्या प्रकरणात, गुन्हा शाखेने 25 साक्षीदार आणि इलेक्ट्रॉनिक व कागदोपत्री पुराव्यांच्या आधारे 140 पानांचे आरोपपत्र दाखल केले आहे. सूत्रांनी पुढे सांगितले की, सुऊवातीला कुडचडे पोलिसस्थानकात नोंदवलेला आणि नंतर गुन्हा शाखेकडे हस्तांतरित केलेला पहिला गुन्हा देखील तपासाच्या अंतिम टप्प्यात असून, लवकरच त्यावर आरोपपत्र दाखल होण्याची शक्यता आहे.
सोहमला सशर्त जामीन मंजूर
आणखी एका ताज्या घडामोडीत, बाल न्यायालयाने गुऊवारी सोहम नाईकला लैंगिक अत्याचाराच्या एका प्रकरणात सशर्त जामीन मंजूर केला आहे.