बदललेली दोन अर्भके मातापित्यांना सुपूर्द
वृत्तसंस्था / झांशी
उत्तर प्रदेशातील झांशी येथे रुग्णालयाला आग लागल्यानंतर आदलाबदल झालेली दोन अर्भके त्यांच्या मूळ मातापित्यांना सुपूर्द करण्यात आल्याने मोठी कोंडी दूर झाली आहे, अशी माहिती देण्यात आली आहे. गेल्या शनिवारी झांशी येथील महाराणी लक्ष्मीबाई वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात अर्भक कक्षाला लागलेल्या भीषण आगीत दहा अर्भकांचा मृत्यू झाला होता. तथापि, अनेक बालकांना या दुर्घटनेतून वाचविण्यात आले होते. वाचविण्यात आलेल्या अर्भकांना त्यांच्या मातापित्यांकडे देताना दोन अर्भकांची अदलाबदल झाली होती. चोवीस तासात हा प्रकार लक्षात आल्याने रुग्णालयाकडून त्वरेने हालचाल करण्यात आली आणि या अर्भकांना त्यांच्या खऱ्या मातापित्यांकडे सोपविण्यात आले.
17 नोव्हेंबरला या रुग्णालयात लक्ष्मी सिंग नामक महिलेने एका कन्येल जन्म दिला होता. त्याच रुग्णालयात कृपा राम यादव यांच्या पत्नीने एका पुत्राला जन्म दिला होता. रुग्णालयाला आग लागल्यानंतर तेथे उपस्थित डॉक्टर आणि नर्स यांनी शक्य तितक्या अर्भकांना सुखरुप बाहेर काढले होते. तथापि, 10 बालकांना वाचविण्यात कर्मचारीवर्गाला अपयश आले. वाचविलेल्या अर्भकांना त्यांच्या मातापित्यांकडे नंतर देण्यात आले. तथापि, लक्ष्मी सिंग या महिलेची कन्या कृपा राम यादव यांच्या पत्नीकडे देण्यात आले आणि त्यांच्या पुत्राला लक्ष्मी सिंग यांच्याकडे देण्यात आले. तथापि, त्वरितच ही अदलाबदल लक्षात आल्याने पुन्हा या अर्भकांना त्यांच्या खऱ्या मातापित्यांकडे सोपविण्यात आले. त्यामुळे साऱ्यांनीच सुटकेचा नि:श्वास सोडला आणि एक समस्या दूर झाली अशी माहिती दिली गेली.
रुग्णालयातील अनागोंदीमुळे दुर्घटना
रुग्णालयातील अर्भक कक्षाला लागलेल्या आगीचे पडसाद आता राजकीय क्षेत्रात उमटण्यासही प्रारंभ झाला आहे. रुग्णालयाच्य्या अनगोंदी कारभारावर प्रचंड टीका केली जात आहे. या रुग्णालयातील अग्नीशमन यंत्रणा काम करत नव्हती. कित्येक वर्षांमध्ये आग विझविणारे सिलिंडर बदलण्यात आले नव्हते. त्यामुळे आग लागल्यानंतर ती लवकर विझवणे शक्य झाले नव्हते. त्यामुळे इतक्या मोठ्या संख्येने अर्भकांचा मृत्यू ओढवला असे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे.
डॉक्टरांचे प्रसंगावधान
ही आग कशामुळे लागली यावर सध्या चर्चा होत आहे. तथापि, दोन डॉक्टरांनी तशा परिस्थितीतही प्रसंगावधान राखून 10 अर्भकांना आगीतून सुखरुप बाहेर काढल्याची बाब स्पष्ट झाली आहे या डॉक्टरांनी आगीच्या झळा बसू नयेत म्हणून आपल्या डोक्यांवर पांढरे कापड बांधून आगीत प्रवेश केला आणि सापडतील तितक्या अर्भकांना घेऊन ते बाहेर आले. त्यामुळे 10 अर्भकांचे प्राण वाचले. ही माहिती सोमवारी प्रसिद्ध करण्यात आली असून या डॉक्टरांची प्रशंसा होत आहे.