अदानींविरोधात दोन प्रकरणे चालणार
वृत्तसंस्था / वॉशिंग्टन
भारतातील विख्यात उद्योगपदी गौदम अदानी यांच्या विरोधात सिव्हील आणि गुन्हेगारी अशा दोन्ही प्रकरणांमध्ये अभियोग चालविण्याचा आदेश अमेरिकेतील कनिष्ठ न्यायालयाने दिला आहे. अदानी यांच्यावर भारतात काही राज्यांमधील प्रशासकीय अधिकाऱ्यांना शेकडो कोटी रुपयांची लाच देऊ केल्याचा आरोप आहे.
हे लाच प्रकरण सिव्हील आणि गुन्हेगारी अशा दोन्ही स्वरुपाचे असल्याने त्यांच्यावर या दोन्ही प्रकारचे अभियोग चालविण्याची आवश्यकता आहे, असे अमेरिकेतील न्यायलयाने स्पष्ट केले आहे. अदानी यांच्या विरोधातील ही प्रकरणे जिल्हा न्यायाधीश निकोलास डी. गारौफिस यांच्यासमोर आहेत. त्यांच्याच न्यायालयात गुन्हेगारी प्रकरणही चालणार आहे. अदानी आणि त्यांच्या उद्योगसमूहातील काही अधिकारी यांनी 2 हजार 29 कोटी रुपयांची एकंदर लाच देऊ केल्याचा आरोप याच न्यायालयात ठेवण्यात आला आहे.
प्रकरण नेमके काय...
गौतम अदानी आणि त्यांचा उद्योगसमूह यांनी भारतात विविध राज्यांमध्ये सौरविद्युत निर्मितीची कंत्राटे मिळविण्याची योजना केली होती. ही कंत्राटे आपल्या उद्योगसमूहाला मिळावीत, यासाठी त्यांनी भारतातील काही राज्यांमध्ये प्रशासकीय अधिकाऱ्यांना मोठ्या रकमांची लाच देऊ केली होती, असा आरोप आहे. ही लाच त्यांनी प्रत्यक्ष दिली होती, की केवळ देण्याचे मान्य केले होते, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, त्यांच्यावर आणि त्यांच्या काही निकवटर्ती अधिकाऱ्यांवर हा आरोप करण्यात आला आहे. यामुळे हा अभियोग चालत आहे.
अमेरिकेच्या न्यायालयात का...
अदानी उद्योगसमूहाच्या अनेक प्रकल्पांसाठी विदेशातून कर्ज घेण्यात आले होते. अमेरिकेतूनही या समूहाने विविध योजनांच्या अंतर्गत सार्वजनिक रोख्यांच्या माध्यमातून पैसा उभा केला होता. याच पैशापैकी काही पैशाचा उपयोग अदानी यांनी भारतीय अधिकाऱ्यांना लाच देऊ करण्यासाठी केला, असे अमेरिकेच्या तपास यंत्रणांचे म्हणणे आहे. यामुळे अमेरिकेतील नागरीकांची आर्थिक हानी झाली, असाही या यंत्रणांचा आरोप आहे. या संदर्भात अमेरिकेत तक्रार सादर झाली असल्याने त्या देशात अदानी यांच्या विरोधात अभियोग चालविला जात आहे.