एकाच दिवसात दोन कर्णधारांचे राजीनामे
टीम साऊदी, बाबर आझम यांचा कर्णधारपदावरुन पायउतार होण्याचा निर्णय
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
बुधवारी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दोन संघाच्या कर्णधारांनी राजीनामे देत एकच खळबळ उडवून दिली. किवी कर्णधार टीम साऊदी व पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम यांनी राजीनामे दिले आहेत. एका दिवशी एका तासात दोन्ही कर्णधारांनी राजीनामे दिल्याने अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. न्यूझीलंड संघाच्या कर्णधारपदाचा साऊदीने राजीनामा दिला आहे. तर दुसरा पाकिस्तानचा स्टार खेळाडू बाबर आझमने कर्णधारपदावरून पायउतार होण्याचा निर्णय घेतला आहे. दोन्ही कर्णधारांनी वैयक्तिक कामगिरीवर लक्ष केंद्रित करत आणखीच दमदार प्रदर्शन करणार असल्याचे सांगितले आहे.
केन विल्यमसनने संघाचे कर्णधारपद सोडल्यानंतर साऊदीने 2022 मध्ये कर्णधारपदाची जबाबदारी स्वीकारली होती. त्याने 14 कसोटीत संघाचे नेतृत्व केले. त्यापैकी सहा सामने जिंकले, तर सहा सामन्यात पराभव पत्करावा लागला आणि दोन सामने अनिर्णित राहिले. न्यूझीलंडला नुकत्याच झालेल्या श्रीलंकेविरूद्ध कसोटी मालिकेत मोठा पराभव पत्करावा लागला. दरम्यान, साऊदीने संघाच्या हितासाठी कसोटी कर्णधारपद सोडत असल्याचे सांगितले आहे. अशा परिस्थितीत सलामीवीर टॉम लॅथम 16 ऑक्टोबरपासून भारताविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत न्यूझीलंडचे नेतृत्व करताना दिसणार आहे.
पाकिस्तानच्या बाबर आझमचाही पदत्याग
पाकिस्तानचा खेळाडू बाबर आझमने पुन्हा एकदा कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने बाबर आझम कडे वनडे आणि टी 20 क्रिकेट फॉरमॅटचे कर्णधारपद सोपवले होते. विशेष म्हणजे आझमला दुसऱ्यांदा कर्णधारपद दिले होते. वर्ल्ड कपमध्ये पाक संघ बाहेर पडल्यामुळे त्याला कर्णधारपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. मात्र संघाची कामगिरी आणखीनच खालावल्याने बोर्डाने त्याच्याकडे वनडे आणि टी 20 क्रिकेटचे कर्णधारपद दिले होते. मात्र बाबरने आता दोन्हीही कर्णधारपदावरुन पायउतार होण्याचा निर्णय घेतला आहे. आता कर्णधार कोण असेल याचा निर्णय लवकरच घेतला जाणार असला तरी सध्या पाकिस्तान संघाचे लक्ष इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेवर आहे.