For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

नेपाळमध्ये भूस्खलनामुळे दोन बस नदीत कोसळल्या

06:58 AM Jul 13, 2024 IST | Tarun Bharat Portal
नेपाळमध्ये भूस्खलनामुळे दोन बस नदीत कोसळल्या
Advertisement

50 हून अधिक प्रवासी बेपत्ता : चालकासह 7 भारतीयांचा मृत्यू; दोघांनी उडी मारून वाचवला जीव

Advertisement

वृत्तसंस्था/ काठमांडू

नेपाळमध्ये मुसळधार पावसात शुक्रवारी सकाळी महामार्गावर दरड कोसळल्याने दोन बस त्रिशूली नदीत पडल्या. घटनास्थळी उपस्थित अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही बसमध्ये चालकांसह 63 जण होते. या दुर्घटनेत एका बसचालकासह 7 भारतीयांचा मृत्यू झाला. तसेच 50 हून अधिक लोक बेपत्ता असून त्यांचा शोध सुरू आहे. या दुर्घटनेवेळी दोघांनी बसमधून उडी मारून आपला जीव वाचवला.

Advertisement

मध्य नेपाळमधील मदन-आश्रित महामार्गावर पहाटे 3.30 वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. जोरदार पावसामुळे महामार्गावर झालेल्या भूस्खलनामुळे दोन बस नदीपात्रात कोसळून वाहून गेल्या. या बसमधून जवळपास 65 जण प्रवास करत होते. नदीपात्रात कोसळलेल्या बस पाण्यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला जात आहे. सततचा पाऊस आणि पाण्याचा जोरदार प्रवाह यामुळे शोध आणि बचावकार्यात अडचणी येत आहेत. भूस्खलनामुळे नदीत पडलेली एक बस काठमांडूला जात होती. त्यात 24 जण होते. दुसऱ्या बसमध्ये 41 जण प्रवास करत होते. नेपाळचे पंतप्रधान पुष्पकमल दहल यांनी या अपघातावर शोक व्यक्त केला आहे.

गेल्या 7 दिवसात 62 जणांचा मृत्यू

नेपाळमध्ये गेल्या सात दिवसात 62 लोकांचा मृत्यू झाला असून 90 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. त्यापैकी 34 लोकांचा भूस्खलनात मृत्यू झाला, तर 28 लोक पुरात वाहून गेले. नेपाळमध्ये मुसळधार पावसामुळे अनेक भागात पुरात 121 घरे वाहून गेली असून 82 घरे उद्ध्वस्त झाली आहेत. देशात पाऊस आणि खराब हवामानामुळे काठमांडू ते भरतपूरची सर्व उड्डाणे पुढील आदेशापर्यंत रद्द करण्यात आली आहेत.

Advertisement
Tags :

.