वाघाच्या हल्ल्यात दोन म्हशी ठार
दांडेली तालुक्यातील हरगाळी येथील घटना
कारवार : वाघाच्या हल्ल्यात दोन म्हशी ठार तर अन्य दोन म्हशी गंभीर जखमी झाल्याची घटना सोमवारी दांडेली तालुक्यातील हरगाळी येथे घडली. नेहमीप्रमाणे वन्यप्रदेशात चरायला गेलेल्या म्हशींवर वाघाने हल्ला केल्याने हरेगाळी परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या म्हशी सखुबाई बोडके यांच्या मालकीच्या असून केवळ दुग्धव्यवसायात अवलंबून असलेल्या गंभीर आणि मागासवर्गीय गवळी समाजातील सखुबाई बोडके यांची लाखो रुपयांची हानी झाली आहे. वाघाच्या हल्ल्यात गंभीररित्या जखमी झालेल्या म्हशींवर स्थानिकांच्या आणि पशुवैद्यांच्या मदतीने उपचार करण्यात येत आहेत. घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली आणि घटनेची माहिती वन खात्याच्या अधिकाऱ्यांना दिली.
अरण्य खात्याच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेवून घटनेची पाहणी केली आणि वाघाच्या हालचालींवर नजर ठेवण्यात आली आहे. यावेळी वन खात्याच्या कर्मचाऱ्यांनी पाळीव प्राण्यांचा आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी योग्य ते उपाय हाती घेण्यात येतील, याची हमी दिली. जंगलाच्या सानिध्यात वास्तव्य करून राहणाऱ्या हरेगाळी आणि अन्य खेड्यांमधील जनतेला केवळ वाघच नव्हे तर अन्य वन्य प्राण्यांकडून होणाऱ्या उपद्रवमध्ये अलिकडच्या काळात वाढ झाली आहे. त्यामुळे जनता भीतीच्या वातावरणात वावरत आहे. त्यामुळे अन्य प्राण्यांचा वन खात्याने बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे. दरम्यान सोमवारी वाघाच्या हल्ल्यात दुभत्या म्हशी गमावलेल्या सखुबाई बोडके यांनी वन खात्याकडे तातडीने आर्थिक मदत मिळवून द्यावी, अशी मागणी करण्यात येत आहे.