खून प्रकरणी दोघा भावांना आजन्म कारावास
इस्लामपूर :
वाळवा तालुक्यातील शिगाव येथील अनिकेत उर्फ बबलू शिवाजी फार्णे (25) याच्या खूनप्रकरणी आरोपी शैलेश उर्फ पुष्पराज विलास घाटगे व निलेश विलास घाटगे (रा. शिगाव) दोघा भावांना न्यायालयाने आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली. आरोपींना 20 हजार रूपये दंड देण्याचे आदेश जिल्हा न्यायाधीश क्र. 1 चे ए. एच. काशीकर यांनी दिले आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी, 8 ऑक्टोबर 2019 रोजी शिगाव येथील मृत अनिकेत फार्णे व आरोपी शैलेश घाटगे व निलेश घाटगे यांच्यात एकमेकांच्याकडे बघण्याच्या कारणावरून मिरवणूकी दरम्यान वाद झाला होता. त्यावेळी काही युवकांनी मध्यस्थी करत हा वाद मिटवला होता. दरम्यान अनिकेत व त्याचा मित्र सौरभ हे शैलेश याच्या घरी जाब विचारण्यासाठी गेले. शैलेश याच्या घरी त्याचा भाऊ निलेश व त्यांचा मामा विश्वास गुलाब लोंढे हे होते. यावेळी विचारपूस करत असताना निलेश याने तलवार घेवून तर शैलेश याने हातात चाकूने अनिकेत याच्या तोंडावर व छातीवर, हातावर वार केले. तर मामा विलास लोंढे याने अनिकेत यास पकडले. तर सौरभ याच्या पाठीत शैलेशने चाकू मारला. यावेळी अनिकेत याच्यावर चाकू व तलवारीने हल्ला केल्याने त्याला उपचारसाठी आष्टा येथे आणले. पुढील उपचारासाठी सांगली नेले असता डॉक्टरांनी अनिकेत यास तो मयत झाला असल्याचे सांगितले.
याप्रकरणी सौरभ संभाजी चव्हाण याने आष्टा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. न्यायालयात सरकार पक्षातर्फे 11 साक्षीदारांची साक्षी तपासल्या. यापैकी फिर्यादी सौरभ चव्हाण, साक्षीदार आरती चव्हाण, अमृता फार्णे, विजय जगताप, स्वराज शिंदे, वैद्यकीय अधिकारी डॉ. पी. सचिन, स. पो. नि. दिलीप ढेरे यांच्या साक्षी महत्वाच्या ठरल्या. सरकार पक्षातर्फे सहाय्यक सरकारी वकील अॅड. शुभांगी पाटील यांनी काम पाहिले. पो.उ.नि. दिनकर महापुरे, पो. हे. कॉ. उत्तम शिंदे, पो.हे.कॉ. चंद्रशेखर बकरे यांचे सहकार्य मिळाले.