बहिणीची हत्या केलेल्या दोन भावांना मृत्युदंड
बेंगळूर : ऑनर किलिंग प्रकरणात विजापूर जिल्हा न्यायालयाने दोन आरोपींना ठोठावलेली मृत्युदंडाची शिक्षा उच्च न्यायालयाच्या कलबुर्गी खंडपीठाने कायम केली आहे. त्याचप्रमाणे त्याच कुटुंबातील इतर आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. विजापूर जिल्ह्याच्या मुद्देबिहाळ तालुक्यातील इब्राहिम साब (वय 31) आणि अकबर (वय 28) अशी मृत्युदंडाची शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. बानू बेगम हिने 2017 मध्ये दलित युवकाशी प्रेमविवाह केला होता. त्यामुळे तिला तिच्या भावांनी जिवंत जाळले होते. बानू बेगम 9 महिन्यांची गर्भवती असताना इब्राहिम आणि अकबर यांनी तिला पेटविले होते. या प्रकरणासंबंधी बसवनबागेवाडी पोलिसांनी विजापूर जिल्हा न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते. सुनावणीनंतर न्यायालयाने त्या दोघांना मृत्युदंडाची शिक्षा व इतर आरोपींना जन्मठेपेची शिक्षा ठोठावली होती. याविरोधात बानू बेगमच्या कुटुंबीयांनी उच्च न्यायालयात अपील केले होते. या प्रकरणी सुनावणी करताना कलबुर्गी खंडपीठाने विजापूर जिल्हा न्यायालयाचा निकाल कायम ठेवला असून इब्राहिम आणि अकबर यांना मृत्युदंडाची तसेच हत्या झालेल्या बानू बेगमची आई व कुटुंबातील इतर 4 सदस्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.