दोन मुलांनी केले चार जणांचे हत्याकांड
उत्तर प्रदेशातील बाघपत मधील मदरशातील घटना
वृत्तसंस्था / बाघपत (उत्तर प्रदेश)
उत्तर प्रदेशातील बाघपत जिल्ह्यातल्या गंगनोली खेड्यात एका मदरशात भयानक हत्याकांड घडले आहे. या मदरशातील दोन अल्पवयीन विद्यार्थ्यांनी मदरशाचे शिक्षक मौलाना इब्राहीम यांची गर्भवती पत्नी आणि त्यांच्या दोन मुलींची हत्या रविवारी रात्री केली. ही घटना सोमवारी उघड झाली. त्यामुळे या खेड्यात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. चौकशीचा आदेश देण्यात आला आहे.
हत्याकांड घडले, तेव्हा मौलाना इब्राहीम हे 100 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या देवबंद येथे गेले होते. तेथे त्यावेळी अफगाणिस्तानचे परराष्ट्र व्यवहार मंत्री अमीर खान मुत्तकी यांचे आगमन झाले होते. त्यांच्या स्वागताचे उत्तरदायित्व मौलाना इब्राहीम यांना देण्यात आले होते. त्यामुळे ते मदरशात नव्हते. हीच संधी साधून त्यांच्याच दोन अल्पवयीन विद्यार्थ्यांनी त्यांची गर्भवती पत्नी आणि त्यांच्या दोन कन्यांची हत्या केली, अशी माहिती बाघपत पोलासांनी दिली आहे.
रात्री 3 वाजता कळले वृत्त
सोमवारी मध्यरात्री 3 वाजता मौलाना इब्राहीम यांना दूरध्वनीवरुन या हत्याकांडाचे वृत्त कळले. त्यानंतर त्वरित ते गंगनौली गावात परतले. त्यावेळी त्यांना या हत्याकांडाची माहीती समजली. हत्या करणारी मुले त्यांचेच विद्यार्थी आहेत, हेही त्यांना समजले. या विद्यार्थ्यांची वये अनुक्रमे 13 आणि 14 अशी आहेत. या दोन विद्यार्थ्यांना, त्यांनी अभ्यास न केल्याने मौलाना इब्राहीम यांनी रविवारी सकाळी भार दिला होता. त्याचा सूड या विद्यार्थ्यांनी अशा प्रकारे उगवला असावा, असे पोलिसांचे अनुमान आहे. मौलाना मदरशात नाहीत, हे पाहून या मुलांनी त्यांच्या खोलीत शस्त्रे घेऊन प्रवेश केला. त्यावेळी रात्र झाली असल्याने मौलाना इब्राहीम यांची पत्नी तसेच दोन मुली झोपलेल्या होत्या. त्यांची पत्नी सात महिन्यांची गर्भवती होती. या मुलांनी त्यांच्यावर शस्त्राने वार करुन त्यांची हत्या केली. पत्नी गर्भवती असल्याने तिच्यासह तिच्या पोटातील भ्रूणाचीही हत्या झाली. अशा प्रकारे या विद्यार्थ्यांनी चार हत्या केल्या आहेत, अशी माहिती दिली गेली.
250 विद्यार्थ्यांचा मदरसा
या मदरशात 250 विद्यार्थी आहेत. त्यांच्यापैकी बहुतेकजण अत्यंत गरीब कुटुंबातून आलेले आहेत. काही विद्यार्थी मदरसा आणि सरकारी शाळा अशा दोन्ही स्थानी शिक्षण घेत आहेत. मदरशात केवळ धार्मिक शिक्षणच दिले जाते. त्यामुळे येथे शिकणाऱ्या बहुतेक विद्यार्थ्यांना केवळ धार्मिक शिक्षणच मिळालेले आहे. या हत्याकांडाच्या घटनेमुळे हे गाव हादरुन गेले असून चौकशी केली जात आहे.