काळाने घेतले दोन कोवळे जीव
कपिलेश्वर मंदिरामागील तलावात बुडून मृत्यू : पोहायला गेले असता भिंत तुटून दुर्घटना : मामा-भाची बचावले
बेळगाव : कपिलेश्वर मंदिराच्या पाठीमागे असलेल्या तलावात पोहण्यासाठी गेलेले चौघे जण बुडाले. यापैकी दोघे जण बचावले असून दोन शाळकरी मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. रविवारी सकाळी ही घटना घडली असून घडघड्याची भिंत कोसळून अंगावर पडल्याने ही दुर्घटना घडली आहे. एका विद्यार्थ्याचा मृतदेह तलावाबाहेर काढण्यात आला असून दुसरा मृतदेह रात्री शोधण्यात यश आले. परशुराम राजू निलजकर (वय 11) राहणार शिवाजीनगर, शिवम परशुराम सुंडीकर (वय 7) राहणार जेड गल्ली, शहापूर अशी त्या दुर्दैवी मुलांची नावे आहेत. हे दोघे नातेवाईक होते. परशुराम बाबुराव सुंडीकर (वय 36) व संस्कृती अमित पाटील (वय 13) राहणार शास्त्राrनगर हे बचावले असून अंगावर दगड पडून त्यांना खरचटले आहे.
रविवार दि. 3 मे रोजी सकाळी 9 वाजता ही घटना घडली. घटनास्थळी मोठी गर्दी जमली होती. मृतदेहाचा शोध घेण्यासाठी शासकीय यंत्रणेबरोबरच सामाजिक कार्यकर्त्यांनीही प्रयत्न सुरू केले. पोलीस, अग्निशमन दल, महानगरपालिका, एसडीआरएफ या शासकीय यंत्रणेतील अधिकारी व कर्मचारी रविवारी दिवसभर तलाव परिसरात तळ ठोकून होते. घटनास्थळी दोन्ही कुटुंबीयांचा आक्रोश सुरू होता. उपलब्ध माहितीनुसार जेड गल्ली, शहापूर येथील परशुराम सुंडीकर हे आपला मुलगा शिवम, भाचा परशुराम व भाची संस्कृती यांना सोबत घेऊन रविवारी सकाळी 8 वाजता कपिलेश्वर मंदिराच्या पाठीमागे असलेल्या तलावात पोहायला गेले होते. पोहून झाल्यावर मुलांनी देवदर्शनही घेतले. त्यानंतर घडघड्याच्या कट्ट्यावर हे सर्वजण उभे असताना भिंत कोसळून ते तलावात पडले.
परशुराम सुंडीकर व संस्कृती हे कसेबसे पाण्यातून बाहेर आले. स्थानिक कार्यकर्ते प्रकाश व इतरांनी त्यांना बाहेर काढले. भिंत अंगावर पडल्यामुळे परशुराम व शिवम पाण्यात अडकले. लगेच त्यांना पाण्याबाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू झाले. अग्निशामक दल, एसडीआरएफ व एचईआरएफ रेस्क्यू टीमला पाचारण करण्यात आले. पाण्यात दिसणारे कॅमेरा सोडून शोध घेण्यात आले. दुपारी शिवमचा मृतदेह आढळून आला. परशुराम निलजकर या मुलाच्या मृतदेहासाठी सतत शोधमोहीम सुरू होती. रविवारी रात्री 9 वाजता या मोहिमेला यश आले. घटनेची माहिती समजताच मार्केटचे एसीपी संतोष सत्यनायक, खडेबाजारचे पोलीस निरीक्षक महांतेश धामण्णावर, उपनिरीक्षक आनंद आदगोंड व त्यांचे सहकारी घटनास्थळी दाखल झाले. रात्री उशिरापर्यंत घटनास्थळी गर्दी होती.
बेळगाव उत्तरचे आमदार आसिफ सेठ यांनीही घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली व कुटुंबीयांचे सांत्वन केले. नगरसेवक राजू भातकांडे, शिवाजी मंडोळकर, वैशाली भातकांडे यांच्यासह मनपाच्या अधीक्षक अभियंत्या लक्ष्मी निपाणीकर व इतर अधिकारीही घटनास्थळी तळ ठोकून होते. शोधमोहिमेवर लक्ष ठेवून होते. भिंत अंगावर पडल्यामुळे परशुराम निलजकर या मुलाचा शोध घेणे कठीण जात होते. पाण्यात दिसणाऱ्या कॅमेऱ्यात तोही केवळ हात दिसला. त्यामुळे तलावातील पाणी उपसण्याचे ठरवून पाचहून अधिक पंप सुरू करण्यात आले. सायंकाळी पंपांची संख्या वाढवण्यात आली. रात्री उशिरापर्यंत पाणीउपसा सुरू होता. रविवारी दुपारी आढळलेल्या शिवमचा मृतदेह सिव्हिल हॉस्पिटलमधील शवागारात हलवण्यात आला आहे. खडेबाजार पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली आहे.
यापूर्वीही अनेक जण बुडाले
कपिलेश्वर मंदिरामागील तलावात यापूर्वीही अनेक जण बुडाले आहेत. तलावाच्या मधोमध मंदिर आहे. पूर्वी मंदिराच्या डाव्या बाजूला लोक पोहत होते. बेळगावातील अनेकांनी याच तलावात पोहणे शिकले आहे. परिसरातील अवजड वाहतुकीमुळे त्याची भिंत कोसळली. त्यामुळे पोहणाऱ्यांची अडचण झाली. मंदिराच्या उजव्या बाजूला पोहण्यास सुरुवात झाली. मात्र, सुरक्षिततेसाठी कोणतीच खबरदारी येथे घेतली जात नाही. अनेकांचे बळी जाऊनही पोहण्यासाठी येणाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी कसलीच व्यवस्था नाही. आता घडघडा असलेल्या ठिकाणची भिंतही कोसळली आहे. या तलावात आणखी दुर्घटना घडण्याआधीच या तलावाची साफसफाई करून निगराणी करा, नहून पोहण्यावर बंदी घाला, अशी मागणी केली जात होती. महानगरपालिकेने याची दखल घ्यावी, असे घटनास्थळावर दाखल झालेल्या अनेकांनी सांगितले.
आपण कसे वर आलो माहीत नाही
परशुराम निलजकर हा मुलगा शिवाजीनगरचा. परशुराम सुंडीकर यांचा तो भाचा. त्याची आई देवदर्शनासाठी मथुरेला गेली आहे. दोन मुलीनंतर हा मुलगा झाला होता. सध्या शाळेला सुटी असल्यामुळे तो मामाकडे होता. गेल्या तीन वर्षांपासून सुटीत पोहायला जाण्याचा त्यांचा परिपाठ होता. यंदाही कपिलेश्वर मंदिरामागील तलावात ते पोहण्यासाठी आले. मात्र, दोन मुलांचा बुडून मृत्यू झाला आहे. देवदर्शनासाठी गेलेल्या परशुरामच्या आईला या घटनेची माहिती दिली असून त्या बेळगावला निघाल्याचे सांगण्यात आले. परशुरामचा मामा परशुराम सुंडीकर यांनी या घटनेसंबंधी पत्रकारांना माहिती देताना आम्ही पोहून काठावर आलो होतो. मुलांनी देवदर्शनही घेतले होते. माझ्या कपाळावर अंगारा लावून मुलाने मुका घेतला. घडघड्याच्या कट्ट्यावर थांबलेलो असताना भिंत कोसळून आपण, आपला मुलगा, भाची, भाचा बुडालो. आपण कसे वर आलो माहीत नाही, असे सांगताना मुलगा व भाच्याच्या आठवणीने त्यांना अश्रू अनावर झाले.
दोघांचे मृतदेह मिळाले
शिवम सुंडीकर या मुलाचा मृतदेह दुपारी मिळाला होता. परशुराम निलजकर या मुलासाठी दिवसभर शोधमोहीम सुरू होती. रात्री 9 वाजता त्याचा मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात यश आले. पंप लावून तलावातील पाणी कमी केल्यानंतर कोसळलेल्या भिंतीजवळ पिलर दिसू लागले. जेसीबीने पिलर हलवताच त्यामध्ये अडकलेला मृतदेह बाहेर आला. शोधमोहिमेत गुंतलेले अधिकारी व कार्यकर्त्यांनी तो बाहेर काढला. एचईआरएफ रेस्क्यू पथकातील सदस्य व सामाजिक कार्यकर्ते अवधूत तुडवेकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी शासकीय यंत्रणेबरोबरच मृतदेहाचा शोध घेण्यासाठी प्रयत्न केले.