कुळे दूधसागर नदीत बुडून दोघा मुलांचा मृत्यू
आठ दिवसांतील दुसरी दुर्दैवी घटना : बुडालेले दोघेही चुलतभाऊ
धारबांदोडा : गेल्याच आठवड्यात वास्को येथील चार युवकांचा बुडून मृत्यू होण्याची घटना ताजी असतानाच काल रविवारी सकाळी तांबडीमळ-कुळे येथे दूधसागर नदीत आंघोळीसाठी उतरलेल्या दोघा 17 वर्षीय मुलांचा बुडून मृत्यू झाला. शिवलिंगप्पा दंडीन व सागर दंडीन अशी त्यांची नावे असून दोघेही चुलतभाऊ आहेत. दोघेही मूळ बागलकोट-कर्नाटक येथील असून मयत शिवलिंगप्पा याचे आईवडिल कुळे येथे भाड्याच्या खोलीत राहत आहेत. गेल्या शनिवारी जी घटना घडली तेथून साधारण एक किलो मीटरच्या अंतरावर हा प्रकार घडला आहे. त्यात वास्को येथील मदार कुटुंबातील तिघा सख्ख्या भावांसह एकूण चार जणांचा दुर्दैवी अंत झाला होता. दोघेही नदीवर आंघोळीसाठी जात असताना वाटेत कुळे पंचायत मैदानावर शिवलिंगप्पाचा लहान भाऊ खेळत होता. शिवलिंगप्पाने आपल्या लहान भावालाही नदीवर येण्यास बोलावले होते. दोघेही पुढे गेल्यानंतर लहान भाऊ त्यांच्या मागे नदीवर पोचला व त्यांना बुडताना पाहिले. त्यामुळे हा प्रकार उघडकीस आला.
दोघांनाही येत नव्हते पोहायला
दोघांनाही पोहता येत नव्हते. ज्या ठिकाणी ते पाण्यात उतरले तेथे खोल डोह आहे. पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने ते बुडाले असावेत. शिवलिंगप्पा याचे आईवडिल कुळे येथे भाड्याच्या खोलीत राहत असून हे कुटुंब मूळ बागलकोट कर्नाटक येथील आहे. स्थानिकांनी दोघांचेही मृतदेह पाण्याबाहेर काढले. कुळे पोलीस स्थानकाचे उपनिरीक्षक संदीप निंबाळकर यांनी पंचनामा केला.
दोन्ही घटनांमध्ये साम्य
या घटनेशी मागील आठवड्यात घडलेल्या घटनेशी बरेच साम्य आहे. वास्को येथील चार युवक पाण्यात बुडाले व त्यापैकी पाचव्या मित्राला पोहता येत नसल्याने तो काठावर उभा राहिल्याने ही घटना उघडकीस आली होती. कालच्या घटनेत त्यांचा भाऊ त्यांच्या पाठिमागून जरा उशिरा नदीवर पोचल्याने दोघेही बुडाल्याचे लगेच समजले.
आजीचे न ऐकता पोहोचले नदीवर...
कालच्या घटनेतील शिवलिंगप्पा हा बागलकोट येथे आपल्या काकांकडे राहून शिक्षण घेत होता. दोन दिवसांपूर्वी तो आपला चुलतभाऊ सागर याला घेऊन कुळे येथे आला होता. रविवारी सकाळी त्यांनी तांबडीमळ येथील दूधसागर नदीत आंघोळीसाठी जाण्याचा बेत केला. ही गोष्ट त्यांच्या आजीला कळल्यानंतर तिने मागील आठवड्यात चारजण बुडाल्याच्या घटनेची आठवण कऊन देत नदीवर जाण्यास मनाई केली होती. पण तिचे ऐकून न घेता ते नदीवर पोचले आणि अनर्थ घडला.