Sangli : कुपवाड–मिरज रस्त्यावर दोन दुचाकींची समोरासमोर धडक; दोघांचा जागीच मृत्यू
विमल पाईप कंपनीसमोर भीषण अपघात
कुपवाड : कुपवाड ते मिरज रस्त्यावर विमल पाईप कंपनीसमोर सोमवारी रात्री साडेआठच्या सुमारास दोन दुचाकीची समोरासमोर धडक झाली. यामध्ये दोन युवक जागीच ठार झाले. तर एका दुचाकीवरील महिला गंभीर जखमी झाली आहे. या घटनेची कुपवाड पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे.
या अपघातात राहुल सुभाष कांबळे (वय ३८, सध्या रा. शिवाजी कॉलनी, मिरज. मूळ गाव सिद्धेश्वर मंदिराजवळ, उपळावी ता. तासगाव) व तुषार अशोक पिसे (वय २४, रा. मुजावर प्लॉट, कुपवाड) अशी ठार झालेल्या तरुणांची नावे आहेत. तर रेणू राजेंद्र शिंगे (वय ६५, रा. मुजावर प्लॉट, कुपवाड) असे गंभीर जखमी झालेल्या महिलेचे नाव आहे. जखमीवर मिरजेतील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास कुपवाडहून मिरजेकडे जाणाऱ्या रस्त्यावर विमल पाईप कंपनीसमोर दोन दुचाकीची समोरासमोर जोरदार धडक झाली. या अपघातात दोन्ही दुचाकी रस्त्यावर आदळल्याने दुचाकीस्वारांना जोराचा मार लागून प्रचंड रक्तस्त्राव झाला. त्यामुळे दोघेही जागीच बेशुद्ध झाले. एका दुचाकीवर राहुल कांबळे तर दुसऱ्या दुचाकीवर तुषार पिसे व त्याच्या पाठीमागे रेणू शिंगे ही महिला बसली होती.
घटनास्थळी बघ्यांनी प्रचंड गर्दी केली होती. अपघाताची माहिती मिळताच आयुष हेल्पलाइन टिमने तातडीने घटनास्थळी धाव घेऊन जखमींना मिरजेतील शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र. तेथे जखमी दोघांना डॉक्टरांनी मृत घोषित केले. या घटनेत दुचाकीवरील रेणू शिंगे ही महिला गंभीर जखमी आहे. जखमीवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.