एका रात्रीत दोन बँकेची एटीएम फोडली
शिवथर व वडुथ गावात घडली घटना,
17 लाख रुपये लंपास,
एसबीआय व बॅँक ऑफ इंडिया बँकेचे एटीएम,
गॅस कटरचा केला वापर,
सीसीटीव्हीवर मारला स्प्रे, तोंडावर घातले मास्क,
एटीएमच्या बाहेर सुरक्षा रक्षक नाही
सातारा
सातारा तालुक्यातील शिवथर व वडुथ या गावातील स्टेट बँक ऑफ इंडिया व बँक ऑफ इंडिया या बॅँकेच्या एटीएम गॅस कटरच्या सहाय्याने शनिवारी मध्यरात्री फोडण्यात आले आहेत. या दोन्ही एटीएम मधून 17 लाख रूपये चोरट्यांनी लंपास केले आहेत. त्यानुसार सातारा तालुका पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केली असून चार चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले असून त्यांचा शोध सुरू असल्याची माहिती तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निलेश तांबे यांनी दिली.
शनिवारी मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास चार सराईत चोरट्यांच्या टोळीने तोंडाला मास्क लावून वडुथ येथील बॅँक ऑफ इंडियाच्या एटीएम मशीनच्या गाळ्यामध्ये प्रवेश केला. या गाळ्यात लावलेल्या सीसीटीव्हीवर त्यांनी स्प्रे मारला. एटीएम मशीन गॅस कटरने फोडले. आणि 10 लाख 50 हजार रूपये चोरले. त्यानंतर याच गावाशेजारी असलेल्या शिवथरमधील स्टेट बँक ऑफ इंडिया बँकेचे एटीएम गॅस कटरच्या सहाय्याने फोडून 6 लाख 50 हजार रूपये लंपास केले. या चोरीची माहिती ग्रामस्थांनी बॅँकेला व सातारा तालुका पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली. यावेळी सीसीटीव्ही फुटेजही तपासण्यात आले आहेत. हे सराईत गुन्हेगार असून इतर राज्यातील टोळी असल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. त्यानुसार पुढील तपास करण्यात येत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक निलेश तांबे यांनी दिली आहे.
एटीएम बाहेर सुरक्षा रक्षक नाहीत...
सातारा शहरासह तालुक्यात विविध बॅँकांचे एटीएम आहेत. यातील काहीच एटीएम मशीनबाहेर सुरक्षा रक्षकांची नेमणूक बॅँकेच्या वतीने करण्यात आली आहे. परंतु बरेचसे एटीएम मशीनला सुरक्षा रक्षक नसतात त्यामुळे या एटीएमची सुरक्षा रामभरोसे सोडण्यात येत आहे. वडुथ आणि शिवथर या दोन्ही एटीएम मशीन बाहेर सुरक्षा रक्षक नसल्याने याचाच गैरफायदा चोरट्यांकडून घेण्यात आला आहे. यामुळे बॅँकांकडून सुरक्षेतेच्या दृष्टीने आणखी उपाययोजना करणे गरजेचे असल्याचे नागरिकांकडून सांगण्यात येत आहे.