दोन क्रीडापटू बुडाले ; दोघांना वाचविले
फोंडा साई हॉस्टेलचे सात युवक गेले होते सहलीला
प्रतिनिधी/ फोंडा
क्रीडा प्रकल्प कुर्टी-फोंडा येथील साई हॉस्टेलच्या 7 युवकांसह गांजे येथे म्हादई नदीच्या पात्रात पावसाळी सहलीसाठी गेलेले 4 युवक बुडाल्याची दुर्दैवी घटना काल रविवारी सायंकाळच्या सुमारास उघडकीस आली. त्यापैकी पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्यानंतर झुडूपांमध्ये अडकून जिवाच्या आकांताने आक्रोश करणाऱ्या दोघा युवकांना स्थानिक युवक प्रलय गावडे याने देवदूत बनून वाचविले. बुडून बेपत्ता झालेल्या अन्य दोघांच्या शोधार्थ फोंडा अग्निशामक दल व फोंडा पोलिस यांच्या मार्गदर्शनाखाली शोध मोहीम जारी आहे.
फोंडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 7 जणांच्या गटाने रविवारची सुट्टी असल्याने गुगलच्या साहाय्याने वर्षा ऋतूचा आनंद घेण्यासाठी नदीकाठी सहलीचा बेत आखला होता. त्यानुसार दुचाकींनी गांजे येथील म्हादई नदीकाठी सहलीसाठी ते दाखल झाले होते. दुपारच्या सुमारास जेवण केल्यानंतर ते नदीच्या पात्रात एकदम कमी पाणी असलेल्या ठिकाणी निसर्गाचा आनंद घेत होते.
अचानक खुल्या केल्या धरणाच्या गेट्स
अचानक गांजे धरणाच्या दोन गेट खोलण्यात आल्या. त्यामुळे अचानक संथ असलेल्या पाण्याचा प्रवाह वाढला, नदीच्या पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने काही काळातच ते वाहून गेले. पाण्यात उतरलेल्या चारजणांपैकी दोघेजण झुडूपांचा आधार घेत तिथेच अडकले. यावेळी त्यांनी जीवाच्या आकांताने आरडाओरडा सुरू केला. नेमक्या यावेळी बंधाऱ्याच्या प्लेट काढण्यासाठी आलेल्या प्रणय गावडेने दोघांना वाचविले.
बुडालेले दोघे महाराष्ट्र, पंजाबातील
बुडून बेपत्ता झालेल्या युवकांमध्ये धनंजय भानुदास खैरनाथ (18, मूळ धुळे, महाराष्ट्र) व लवप्रित सिंग (24, पटीयाला-पंजाब) यांचा समावेश आहे. उशिरा रात्री मिळालेल्या माहितीनुसार लवप्रित सिंग याचा मृतदेह आढळल्याची माहिती प्राप्त झाली आहे. तो कुर्टी येथील क्रीडा प्रशिक्षण केंद्रात इंटर्नशीप करीत होता.
प्रणय गावडे ठरला बुडणाऱ्यांसाठी देवदूत
बंधाऱ्याची दारे खुली करण्यासाठी कंत्राटी कामाला असलेल्या प्रणय गावडे हा प्लेट काढण्यासाठी आला होता. दोघांना अडकलेल्या स्थितीत पाहून युवकाने आपल्या जीवाची पर्वा न करता बंधाऱ्याचे दार बंद केले. जेणेकरून पाण्याचा ओघ कमी झाला. पाणी कमी झाल्यानंतर दोरीच्या साहाय्याने गटांगळ्या खात झुडुपांच्या आधारावर असलेल्या युवकांना आधार देत अथक परिश्रमानंतर त्यांना वाचविण्यात प्रणय गावडे याला यश आले. ..
गुगल मॅपच्या साहाय्याने दाखल झाले म्हादई नदीच्या पात्रात
कुर्टी फोंडा येथील क्रीडा प्रकल्पात ज्युडो प्रशिक्षण प्राप्त करण्यासाठी या युवकांचा साई हॉस्टेल येथे मुक्काम आहे. गुगल मॅपच्या साहाय्याने त्यांनी गोवा दर्शनाचा बेत आखला होता. गांजे येथील धरणाच्या विहंगम निसर्गसैंदर्याची झलक अनुभवण्यासाठी ते धरणाच्या खालच्या बाजूला दाखल झाले होते. नेमक्या याचवेळी धरणाची दारे उघडल्यामुळे काही कळण्याअगोदर पाण्याचा प्रवाह वाढल्याने त्यांच्यावर हा बाका प्रसंग ओढवला. सहलीला गेलेल्यांमध्ये सर्वजण बिगरगोमंतकीय आहेत. सरकारने काही दिवसांपूर्वी कुणीही नदीकाठी सहलीसाठी, आंघोळीसाठी जाऊ नये, असा सावधगिरीचा इशारा दिला होता, तरीही हे युवक नकळत दाखल झाल्यामुळे ही दुर्दैवी घटना घडली आहे.
दरम्यान फोंडा अग्निशामक दलाचे सुशिल मोरजकर यांच्या मार्गदर्शनाखाली बुडून बेपत्ता झालेल्या दोघा युवकांसाठी शोध मोहीम जारी केली. उशिरापर्यंत काहीच आढळले नसल्याने रात्री शोध मोहीम थांबविण्यात आली. आज सोमवारी सकाळी पुन्हा शोध मोहिमेला प्रारंभ करण्यात येणार आहे.