गाभण गायीचे मांसविक्री करणाऱ्या दोघांना अटक
कारवार जिल्हा पोलिसांकडून तब्बल 45 दिवसांनंतर आरोपींना अटक
कारवार : क्रौर्याच्या सर्व सीमा ओलांडून चरणाऱ्या गाभण गायीचे तुकडे तुकडे करून लग्न सोहळ्यासाठी मांसाची विक्री केल्याप्रकरणी तब्बल 45 दिवसांनंतर दोन प्रमुख आरोपींच्या मुसक्या आवळण्यात कारवार जिल्हा पोलिसांना यश आले आहे. या क्रूर घटनेप्रकरणी ताब्यात घेण्यात आलेल्या प्रमुख आरोपींची नावे वासीम आणि मुजाहील अशी आहेत. वासीम याला मुंबईतील गुलबाडी फकीर बाजारपेठेत ताब्यात घेण्यात आले आहे. तर मुजाहील याला भटकळ येथे त्याच्या राहत्या घरी ताब्यात घेण्यात आले आहे.
यापूर्वी ताब्यात घेण्यात आलेल्यांची नावे तौफीक आणि फैजान अशी आहेत. फैजान याला पोलिसांनी पायावर गोळीबार करून ताब्यात घेतले होते. विवाह सोहळ्यासाठी आवश्यक असलेल्या मांसासाठी गाभण गायीची हत्या करून गायीच्या पोटातील गर्भ फेकण्यात आल्याची घटना 19 जानेवारी 2025 रोजी होन्नावर तालुक्यातील सालकोड, कुडदकुळी येथे घडली होती. पहिल्यांदा बिबट्यानेच गायीचा फडशा पाडला असावा, असा संशय ग्रामस्थांना आला होता. तथापि, जेंव्हा या व्रुरतेच्या पाठीमागे समाजकंटक आहेत, यावर शिक्कामोर्तब झाल्यानंतर जिल्ह्यात संतापाची लाट उसाळली होती.
इतकेच नव्हे तर या घटनेने संपूर्ण राज्यात खळबळ माजली होती. यावेळी ग्रामस्थांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली होती आणि आरोपींना तातडीने अटक करावी, या मागणीसाठी नागरिक रस्त्यावर उतरले. याबद्दल जिल्हा पोलीस प्रमुख एम. नारायण यांनी दिलेली अधिक माहिती अशी, 19 जानेवारी रोजी गाभण गायीचे तुकडे तुकडे करून गायीच्या पोटातील गर्भ फेकण्यात आल्याची गंभीर तक्रार स्थानिकांनी केली होती. आरोपींचा शोध लावण्यासाठी सहा पथकांची नियुक्ती करण्यात आली होती. गंभीर प्रकरणावरुन धार्मिक तेढ निर्माण होणार नाही याची दखल घेत तौफिक आणि फैजान या आरोपींना तातडीने ताब्यात घेण्यात आले होते.
थापि, या प्रकरणातील प्रमुख आरोपी वासीम आणि मुजाहील यांनी 23 जानेवारी रोजी मोटारसायकलवरुन धारवाड गाठले होते. धारवाड रेल्वेस्थानक परिसरात मोटारसायकल ठेवून पुढे ते अज्ञातस्थळी रेल्वेने गेले होते. आरोपींचा शोध लावण्यासाठी सहा पथकांची नियुक्ती केली होती. आरोपींची माहिती देणाऱ्यांना एक लाख रुपयांच्या बक्षिसांची घोषणा करण्यात आली होती. सहा पथकांनी आरोपींना ताब्यात घेण्यासाठी हावेरी, विजापूर, गदग, कलबुर्गीसह गोवा, महाराष्ट्र, उत्तरप्रदेश आदी ठिकाणी भेटी देवून 123 स्थळावरील सीसीटीव्हीवरील छबींची पाहणी केली. तपासावेळी 40 संशयितांची चौकशी करण्यात आली.