लिफ्टच्या बहाण्याने लुटणारे दोघे जेरबंद
सातारा :
शिवराज पेट्रोलपंप (संभाजीनगर) येथे रात्रीचे वेळी लिफ्टच्या बहाण्याने एका परराज्यातील प्रवाशास मारहाण करून लुटमार करणाऱ्या दोन जणांना सातारा शहर पोलिसांनी अटक केली असून जीवन महादेव गायकवाड (वय 20 वर्षे रा. प्रतापसिंहनगर) याच्यासह एका अल्पवयीन युवकाचा समावेश असून त्यामुळे पुन्हा एकदा प्रतापसिंहनगर चर्चेत आले आहे. ही कारवाई सातारा शहर पोलिसांनी केली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, दि. 24 रोजी शिवराज पेट्रोलपंप (संभाजीनगर) येथे रात्रीचे वेळी एक प्रवासी दूध प्रोडक्टचे मार्पेटिंग करून पुणे येथून बेळगाव निघाला होता. तो सातारा येथे खाजगी वाहनाने उतरला होता. सातारा येथून दुसऱ्या वाहनाने तो पुढील प्रवास करणार असल्याने त्यास सातारा एस.टी. स्टॅन्डवर जायचे होते. त्यावेळी त्यास एका दुचाकीवरील तीन युवकांनी सातारा एस.टी. स्टॅन्डवर सोडतो असे सांगितले. रात्रीची वेळ असल्याने व वाहन मिळत नसल्याने तो प्रवासी त्यांच्यासोबत दुचाकीवर बसलेला होता. त्यास त्या युवकांनी एका ठिकाणी काम आहे. ते करून तुम्हाला सोडतो असे सांगून त्यास कृष्णानगर येथील एका मोकळ्या जागी नेहून मारहाण करत त्यांच्याकडील मोबाईल व 10 हजार रूपये काढून घेतले होते. त्यानंतर ते लुटमार करणारे युवक पळून गेले होते. ज्याला लुटले गेले तो मदतीसाठी रोडवर आला होता. त्यावेळी वेळीच रात्रगस्तीच्या पोलिसांची मदत मिळाल्याने त्यांना घडल्या प्रकारची माहिती दिली. त्याने दिलेल्या वर्णनावरून पोलिसांनी संशयितांचा पेट्रोलिंग दरम्यान शोध घेतला. त्यावेळी पोलिसांनी मिळालेल्या वर्णनावरून दोन संशयितांना ताब्यात घेतले असता त्यांनी गुह्याची कबुली दिली. त्यांच्याकडून आणखीन एका साथीदाराचे नाव निष्पन्न झाल्याने पोलिसांनी तात्काळ त्याचा शोध घेवून त्यास देखील ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून लुटमार केलेला मोबाईल व रोख रक्कम, गुन्ह्यात वापरलेली दुचाकी हस्तगत करण्यात आली आहे.
ही कारवाई पोलीस अधिक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधिक्षक, डॉ. वैशाली कडुकर, उपविभागिय पोलीस अधिकारी राजीव नवले, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मस्के यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाचे, सपोनि शामराव काळे, पोलीस उपनिरीक्षक सुधीर मोरे, पो. हवा. निलेश यादव, सुजीत भोसले, निलेश जाधव, विक्रम माने, पो. ना. पंकज मोहिते, पो. कॉ. दिपक ताटे, पो. कॉ. विठ्ठल सुर्वसे, सचिन रिटे, इरफान मुलाणी, संतोष घाडगे, सागर गायकवाड, विशाल धुमाळ, मच्छिंद्रनाथ माने, सुशांत कदम, तुषार भोसले, सुहास कदम, होमगार्ड सुळ यांनी केलेली आहे.