For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बेंगळूर बॉम्बस्फोटातील सूत्रधारासह दोघांना अटक

06:58 AM Apr 13, 2024 IST | Tarun Bharat Portal
बेंगळूर बॉम्बस्फोटातील सूत्रधारासह दोघांना अटक
Advertisement

रामेश्वरम पॅफे स्फोटप्रकरणी एनआयएची कारवाई : पश्चिम बंगालमध्ये घेतला होता आश्रय

Advertisement

वृत्तसंस्था/ कोलकाता

बेंगळूरमधील रामेश्वरम पॅफे बॉम्बस्फोटप्रकरणी राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) शुक्रवारी ‘मास्टरमाइंड’सह दोघांना पश्चिम बंगालमधील कोलकाताजवळ अटक केली. पॅफेमध्ये आयईडी पेरणारा आरोपी मुसावीर हुसेन शाजीब आणि स्फोटाची योजना आखणारा मुख्य सूत्रधार अब्दुल मतीन ताहा अशी आरोपींची नावे आहेत. सदर आरोपी कर्नाटकात स्फोट घडवून पश्चिम बंगालमध्ये पळून गेले होते.

Advertisement

अटक करण्यात आलेले दोन्ही आरोपी कर्नाटकातील शिमोगा जिल्ह्यातील रहिवासी असून ते इस्लामिक स्टेट (आयएसआयएस) या दहशतवादी संघटनेशी संबंधित असल्याचे सांगण्यात येत आहे. हे दोघेही यापूर्वी कर्नाटकातील एका दहशतवादी घटनेत सहभागी असल्याचा संशय असल्यामुळे तपास यंत्रणा त्यांच्या मागावर असतानाच ते ‘एनआयए’च्या जाळ्यात सापडले. 1 मार्चला बेंगळूरस्थित रामेश्वरम कॅफेमध्ये घडवलेल्या स्फोटप्रकरणी त्यांचा शोध घेण्यात कर्नाटक पोलिसांना अपयश आले होते.

शाजिबने पेरली स्फोटके, ताहाने बनवला ‘प्लान’

12 एप्रिल रोजी सकाळी कोलकाताजवळ फरार आरोपींना शोधण्यात यश आल्याचे ‘एनआयए’ने आपल्या अधिकृत निवेदनात म्हटले आहे. सदर आरोपींनी बनावट ओळखपत्राच्या आधारावर येथे आश्रय घेतल्याचेही स्पष्ट करण्यात आले. ‘एनआयए’ने केंद्रीय गुप्तचर संस्थेसह पश्चिम बंगाल, तेलंगणा, कर्नाटक आणि केरळ पोलिसांच्या मदतीने यशस्वी शोधमोहीम राबवत दोघांनाही अटक करण्याची मोहीम यशस्वीपणे पार पाडली. मुसावीर हुसेन शाजीब हा पॅफेमध्ये आयईडी पेरणारा आरोपी असून अब्दुल मतीन ताहा हा बॉम्बस्फोटाची योजना आखण्यात आणि फरार होण्यासाठी मदत करण्यात सक्रिय असल्याचे प्रथमदर्शनी स्पष्ट होत असल्याचा दावा ‘एनआयए’ने केला आहे.

42 दिवसांनी कारवाई

रामेश्वरम पॅफेमध्ये 1 मार्च रोजी आयईडी स्फोट झाला होता. यामध्ये 10 जण जखमी झाले. या घटनेच्या 42 दिवसांनंतर 12 एप्रिल रोजी एनआयएने या प्रकरणातील दोन आरोपींना कोलकात्यापासून 180 कि. मी. अंतरावर असलेल्या पूर्वा मेदिनीपूर जिल्ह्यातील कांठी या छोट्याशा गावातून अटक केली. एनआयएच्या म्हणण्यानुसार शाजिबने पॅफेमध्ये आयईडी ठेवला होता, तर ताहाने संपूर्ण योजना तयार केली होती.

एनआयए चौकशीतून तपासाला गती

एनआयएने यापूर्वी बेंगळूरमधील रामेश्वरम पॅफेमध्ये झालेल्या स्फोटासंदर्भात हल्लेखोराची माहिती देणाऱ्यास 10 लाख ऊपयांचे बक्षीस जाहीर केले होते. माहिती देणाऱ्यांच्या ओळखीची गोपनीयता राखली जाईल यावरही एजन्सीने भर दिला होता. एजन्सीने सीसीटीव्ही पॅमेऱ्याच्या फुटेजमधून घेतलेल्या हल्लेखोराचे छायाचित्रही प्रसिद्ध केले होते. एनआयएने जारी केलेल्या छायाचित्रात हल्लेखोर टोपी, काळी पँट आणि काळे शूज घातलेला दिसत आहे. एनआयएच्या पथकाने स्फोटाच्या ठिकाणी भेट दिल्यानंतर हे प्रकरण 3 मार्च रोजी एनआयएकडे सोपविण्यात आले होते.

दोघेही ‘आयएस’चे हस्तक

मुख्य आरोपी मुसावीर हुसेन शाजीब आणि सह-सूत्रधार अब्दुल मतीन ताहा हे दोघे कर्नाटकातील शिमोगा जिह्यातील तीर्थहळ्ळी येथील रहिवासी आहेत. ते ‘आयएस’चे हस्तक असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर एनआयएने पूर्व मिदनापूरमधील दिघा येथील त्यांचे लपण्याचे ठिकाण शोधून त्यांना पकडले आहे. फरार आरोपींचा शोध आणि अटक करण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून एनआयएने कर्नाटक, तामिळनाडू आणि उत्तर प्रदेशमधील 18 ठिकाणी शोध घेतला. तत्पूर्वी, तपासाचा एक भाग म्हणून मुख्य आरोपीला रसद पुरवणारा मुजम्मिल शरीफ या चिक्कमंगळूर येथील रहिवाशाला 26 मार्च रोजी अटक करण्यात आली होती.

► आरोपींना तीन दिवसांची ट्रान्झीट कस्टडी

रामेश्वरम कॅफेतील बॉम्बस्फोट प्रकरणी अटक केलेल्या आरोपींची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर त्यांना कोलकात्याच्या एनआयए न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी न्यायालयाने दोन्ही आरोपींना तीन दिवसांसाठी ट्रान्झीट कस्टडी दिली आहे. बेंगळूरमधील न्यायालयात हजर करण्यासाठी एनआयएच्या अधिकाऱ्यांनी वेळ मागितल्याने न्यायालयाने आरोपी मुसावीर आणि अब्दुल मतीन यांना तीन दिवसांची ट्रान्झीट कस्टडी दिली आहे.

अटकेच्या कारवाईनंतर ‘राजकारण’

ममता म्हणाल्या... ‘आमच्यामुळेच आरोपींना अटक’

भाजपच्या मते... ‘बंगाल दहशतवाद्यांचे आश्र्रयस्थान’

पश्चिम बंगालमधून रामेश्वरम पॅफे स्फोटातील दोन आरोपींच्या अटकेवरून तृणमूल काँग्रेस आणि भाजपमध्ये राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत.  आमच्यामुळेच बेंगळूर पॅफे बॉम्बस्फोटातील दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली, असे टीएमसी प्रमुख आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी म्हणाल्या. त्या कूचबिहारच्या दिनहाटा येथे निवडणूक प्रचारसभेत बोलत होत्या. तर दुसरीकडे  बंगाल भाजपचे सहप्रभारी अमित मालवीय यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट करत ‘ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखाली पश्चिम बंगाल हे दहशतवाद्यांचे सुरक्षित आश्र्रयस्थान बनले आहे’ असे ट्विट केले आहे. याचदरम्यान राज्य पोलिसांनी अमित मालवीय यांच्या दाव्यांवर टीका केली. बंगाल पोलिसांनी भाजप नेत्याला टॅग करताना ‘केंद्रीय यंत्रणांनी आमच्या भूमिकेचे कौतुक केले आहे. पश्चिम बंगाल हे कधीही दहशतवाद्यांचे सुरक्षित आश्र्रयस्थान राहिलेले नाही. जनतेच्या सुरक्षेसाठी राज्य पोलीस सदैव सतर्क आहेत’, असे म्हटले आहे.

Advertisement
Tags :

.