कचरा फेकणाऱ्यांवर नजर ठेवण्यासाठी दोघांची नियुक्ती
शितल हॉटेलजवळ कचरा फेकण्याचा प्रकार
बेळगाव : मध्यवर्ती बसस्थानक ते खडेबाजार रस्त्यावरील शितल हॉटेलजवळील मंदिराशेजारी गेल्या काही वर्षापासून कचरा फेकण्यात येत आहे. त्यामुळे त्याठिकाणी कचऱ्याचा ढीग पडून रहात आहे. रस्त्यावर कचरा फेकू नये यासाठी आता आमदार राजू सेठ यांनी दोन कर्मचाऱ्यांची तेथे नियुक्ती केली आहे. शितल हॉटेल शेजारी रात्रीच्यावेळी कचरा फेकून देत आहेत. वास्तविक तो कचरा महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांकडे दिला पाहिजे. मात्र रात्री काही दुकानदार दुकाने उशिराने बंद केल्यानंतर त्यामधील कचरा त्याठिकाणी फेकून देत आहेत. यापूर्वी अनेकवेळा कचरा फेकू नये अशी सूचना देण्यात आली होती. मात्र त्याकडे येथील व्यावसायिकांनी व नागरिकांनी दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे आमदार राजू सेठ यांनीच त्याठिकाणी त्यावर नजर ठेवण्यासाठी दोघांची नियुक्ती केली आहे. यामुळे जनतेतून समाधान व्यक्त होत आहे.