Kolhapur Crime : बालिंगा गर्भलिंग प्रकरणात दोन एजंट अटकेत
बालिंगा गर्भलिंग प्रकरणात मुख्य आरोपी अद्याप फरार
कोल्हापूर : बालिंगा येथील गर्भलिंग निदान केंद्रावर करवीर पोलिसांनी छापा टाकला होता. या प्रकरणातील मुख्य सुत्रधार बोगस डॉक्टर स्वप्नील केरबा पाटील (रा. बालिंगा, ता. करवीर) हा अद्याप पसारच आहे. या प्रकरणी शनिवारी (दि. ६) नितीन बळवंत किल्लेदार (वय ३५, रा. कंदलगाव, ता. करवीर) आणि विक्रम बसंत चव्हाण (३९, रा. संतमळा, इचलकरंजी) या दोन एजंटना अटक करण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, बोगस डॉक्टर स्वप्नील पाटील याने चालवलेल्या गर्भलिंग निदान आणि गर्भपात केंद्रावर नोव्हेंबर महिन्यात छापा टाकला होता. यावेळी बोगस डॉक्टरस्वप्नील पाटील पळून गेला होता. त्याचा साथीदार दिगंबर मारुती किल्लेदार (४८, रा. तिटवे, ता. राधानगरी) आणि स्वप्नील याचा भाऊ सौरभ पाटील यांना अटक करण्यात आली होती.
किल्लेदार याच्या मोबाइलमालमत्ता जप्तीसाठी पत्रव्यवहार सुरुमुख्य आरोपी असणारा बोगस डॉक्टर स्वप्नील पाटील पसार आहे. अद्याप पोलिसांना सापडलेला नाही. मोबाइल बंद करून तो कर्नाटकात लपला असावा असा पोलिसांचा अंदाज आहे. त्याच्या मालमत्तांचा शोध घेण्यासाठी उपनिबंधक कार्यालय आणि महसूल विभागाशी पोलिसांनी पत्रव्यवहार केला असून लवकरच जप्तीची प्रक्रिया सुरु करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक किशोर शिंदे यांनी दिली.
कॉल्स डिटेल्सवरून पोलिसांना आणखी तीन एजंटची नावे मिळाली. यापैकी नितीन किल्लेदार आणि विक्रम चव्हाण यांना पोलिसांनी अटक केली. आणखी एकाचा शोध सुरू आहे. किल्लेदार आणि चव्हाण यांनी काही महिलांना गर्भलिंग तपासणीसाठी स्वप्नील पाटील याच्याकडे पाठविल्याचे पोलिसांच्या तपासात स्पष्ट झाले आहे. चौकशीतून आणखी काही एजंटची नावे समोर येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली.