फातोर्डा दुहेरी खूनप्रकरणी दोन आरोपींना जन्मठेप
प्रतिनिधी/ मडगाव
चंद्रावाडा -
फातोर्डा येथील मिंगेल मिरांडा व त्यांची सासू कॅथरिना पिंटो यांच्या खून प्रकरणासंबंधी मडगावच्या सत्र न्यायालयाने काल शुक्रवार 26 रोजी या प्रकरणातील दोन आरोपींना जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. या दुहेरी खून प्रकरणात एका अल्पवयीन मुलाचा हात होता. त्याच्याविरुद्ध ‘ज्युवेनाईल बोड’&मध्ये खटला चालू आहे.
सरकार पक्षानुसार 8 मार्च 2021 रोजी सकाळी सुमारे 7.15 वाजता आरोपींनी मडगाव येथील मिंगेल मिरांडा यांच्या घरात बेकायदेशीर प्रवेश करून बळजबरीने चोरी केली. यावेळी आरोपींनी मिंगेल मिरांडा यांच्या रोख रक्कम असलेले पाकीट तसेच सोन्याची साखळी चोरुन नेली. बळजबरी चोरीच्या दरम्यान आरोपींनी मोठ्या हातोड्याने (घण) व चाकूने मिंगेल मिरांडा तसेच कॅथरिना पिंटो यांच्यावर केलेल्या हल्ल्यात दोघांचाही जागीच मृत्यू झाला होता. मयत मिरांडा हे कंत्राटदार असल्यामुळे त्यानी या आरोपींना कामगार म्हणून ठेऊन घेतले होते. या दुहेरी खुनामुळे संपूर्ण परिसरात त्यावेळी भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
मडगावच्या अतिरिक्त सत्र न्यायाधेश डॉ. पूजा कवळेकर यांच्या न्यायालयाने हा निवाडा दिला. सरकारपक्षातर्फे सरकारी वकील उत्कर्ष आवडे यांनी काम पाहिले. फातोर्डा पोलिसस्थानकाचे तत्कालीन निरीक्षक कपिल नायक यांनी याप्रकरणी तपास करुन न्यायालयात आरोपपत्र सादर केले होते.
या खटल्यात सरकारपक्षातर्फे एकूण 24 साक्षीदार होते. आरोपी व मयत मिरांडा यांच्यात कामाच्या मजुरीवरुन भांडण होत असल्याचे साक्षीदारांनी सांगितले होते. त्या भांडणातूनच मिंगेल मिरांडा व त्यांची सासू कॅथरिना पिंटो यांचा खून झाल्याचे सरकारपक्षाने न्यायालयात सिद्ध केले. संपूर्ण पुरावे, साक्षीदारांचे जबाब, वैद्यकीय अहवाल आणि सरकारी वकिलांचा युक्तिवाद विचारात घेऊन न्यायालयाने आरोपींना गेल्याच आठवड्यात दोषी ठरवले होते.
न्यायालयाने आरोपींना खालीलप्रमाणे शिक्षा सुनावली आहे : भारतीय दंड संिहतेच्या 302 कलमाखाली (खून) जन्मठेपेची शिक्षा, 449 कलमाखाली (घरफोडी) जन्मठेपेची शिक्षा, 394 कलमाखाली (बळजबरीने चोरी) जन्मठेपेची शिक्षा, 397 कलमाखाली 7 वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा आणि 398 कलमाखाली 7 वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा न्यायालयाने ठोठावली. सर्व शिक्षा एकत्रितरित्या भोगाव्यात, असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे.
न्यायालयाने आरोपींना 50,000 ऊपयांचा दंड ठोठावण्यात आला असून ही रक्कम मृत मिंगेल मिरांडा व कॅथरिना पिंटो यांच्या मुलांना नुकसान भरपाई म्हणून देण्यात येणार आहे. दंड न भरल्यास आरोपींना 3 महिन्यांची आणखी कैद भोगावी लागणार असल्याचे न्यायालयाने आदेशात म्हटलेले आहे.