कुंभारमाठ मारहाण प्रकरणातील दोन आरोपींना सशर्त जामीन
मालवण । प्रतिनिधी
मालवण कुंभारमाठ येथील खालसा पंजाबी ढाबा येथे जेवण न दिल्याच्या रागाने झालेल्या वादविवाद व मारहाण प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेले प्रथमेश रविंद्र शिरपुटे (26 सोमवारपेठ, मालवण )व वैभव बाळकृष्ण मयेकर ( 33 ) धुरीवाडा मालवण यांना ओरोस येथील मे. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश यांनी प्रत्येकी रक्कम रु 50,000/- चा सशर्त जामीन मंजूर केला. आरोपींतर्फे ॲड. स्वरुप नारायण पई व ॲड. यतिश खानोलकर यांनी काम पाहिले. दि. १० फेब्रुवारी २०२५ रोजी रात्री 12 च्या सुमारास प्रथमेश रविंद्र शिरपुटे, वैभव बाळकृष्ण मयेकर, छगन नितीन सावजी, हरेश वसंत ढवळे हे इसम ढाब्यावर जेवण देण्यासाठी वादविवाद करुन जेवण देत नसल्याच्या रागातून या सर्वानी अनोळखी 3 इसमांना बोलावून सर्वानी मिळून ढाबा मालक, मॅनेजर व कामगार यांना मारहाण केली व कोल्ड्रिंकच्या काचेच्या बाटलीने डोक्यावर मारहाण करून जीवघेणा हल्ल्या केल्याची व गंभीर दुखापत केल्याची तक्रार मालवण पोलिस ठाण्यात ११ फेब्रुवारी २०२५ रोजी दाखल करण्यात आली होती. या तक्रारीवरून मालवण पोलिसांनी प्रथमेश रविंद्र शिरपुटे, वैभव बाळकृष्ण मयेकर, छगन नितीन सावजी यांना दि. 11/02/2025 रोजी अटक केली होती. हरेश वसंत ढवळे याला वैद्यकीय तपासणीमध्ये इजा आढळल्याने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केल्याने पोलिसांनी त्याला अटक केली नव्हती. याच दरम्याने संशयितांनी त्यांना ढाबा मालक व कामगार यांनी मारहाण करण्यास सुरुवात केल्यानेच वादविवाद झाल्याची परस्पर विरोधी तक्रार केल्याने ढाबा मालक व कामगार यांचेविरुद्ध देखील मालवण पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली.अटक संशयितांना मालवण येथील मे. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांचे न्यायालयात हजर केले असता मे. न्यायालयाने संशयितांना दि. 15/02/2025 पर्यंत पोलिस कोठडी सुनावली होती. त्यानंतर दि. 15/02/2025 रोजी आरोपीस न्यायालयीन कोठडी मंजूर झाल्यानंतर आरोपी क्र. 3 प्रथमेश शिरपुटे याने मे. सत्र न्यायालय ओरोस येथे केलेला जामीनअर्ज तपासकाम अपूर्ण असल्याच्या व अन्य आरोपी अटक झाले नसल्याच्या कारणास्तव नामंजूर करण्यात आला होता. तेव्हापासून संशयीत न्यायालयीन कोठडीत आहेत.त्यानंतर मालवण पोलिसांनी तपासकाम पूर्ण करुन एकूण सात आरोपींविरुद्ध मे. मालवण न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. त्यानंतर आरोपी क्र. 1 व 3 यांनी मे. सत्र न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला होता. जामीन अर्जाच्या सुनावणीअंती दि. 28/05/2025 रोजी मे. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सिंधुदुर्ग-ओरोस यांनी आरोपींना प्रत्येकी रक्कम रु. 50,000/- चा सशर्त जामीन मंजूर केला.