एलॉन मस्क यांच्याकडून ट्विटर खरेदीची ‘ऑफर’
3.2 लाख कोटी रुपये मोजण्याची तयारी : 54.20 डॉलर प्रतिसमभाग रोख रक्कम देण्यासही सज्ज
वृत्तसंस्था /नवी दिल्ली
इलेक्ट्रिक कार कंपनी टेस्लाचे सर्वेसर्वा एलॉन मस्क यांनी मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्म ट्विटर खरेदी करण्याची तयारी चालवली असल्याचे सांगितले जात आहे. या व्यवहारासाठी मस्क यांनी 3.2 लाख कोटी रुपये मोजण्याची तयारी केल्याचे समजते. यासाठी मस्क यांनी 54.20 डॉलर प्रति समभागाच्या हिशेबाने रोख रक्कम देण्याची तयारी दर्शविली आहे. प्रसिद्ध उद्योजक मस्क यांनी ट्विटर खरेदीच्या प्रस्तावासंबंधी युएस सेक्युरिटीज अँड एक्स्चेंज कमिशन यांच्याकडे माहिती दिली आहे. त्यानंतर आता ट्विटर व्यवस्थापनाने तातडीची बैठक बोलावली असून त्यात मस्क यांच्या ऑफरसंबंधी चर्चा होणार आहे.
ट्विटरमध्ये सुरुवातीला हिस्सेदारी खरेदीनंतर मस्क यांनी ट्विटरच्या मंडळामध्ये सामील होण्याच्या प्रस्तावाला धुडकावून लावले होते. त्यावेळी त्यांनी ट्विटरकडे बोलण्याच्या स्वातंत्र्याची असाधारण अशी क्षमता असून याची व्यापकता मोठी असल्याचे म्हटले होते. ट्विटरला एका खासगी कंपनीमध्ये रुपांतरित करण्याची गरज असल्याचे त्यांनी बोलून दाखविले होते. तर आता ट्विटरमध्ये 100 टक्के हिस्सेदारी खरेदी करण्याचा प्रस्ताव त्यांनी सादर केला आहे.
या बातमीनंतर ट्विटरचे समभाग प्रि मार्केट ट्रेडिंगमध्ये जवळपास 18 टक्के तेजी दाखवून होते. बुधवारी कंपनीचे समभाग 3.10 टक्के इतके वाढून 45.85 डॉलरवर बंद झाले होते. एलॉन मस्क यांच्याकडे सध्याला ट्विटरची 9.2 टक्के इतकी हिस्सेदारी आहे.
आपला प्रस्ताव सर्वोत्तम : मस्क
दरम्यान टेस्लाचे सीईओ एलॉन मस्क यांनी आपण ट्विटर खरेदीचा सादर केलेला प्रस्ताव सर्वोत्तम असल्याचे म्हटले आहे. जर का मंडळाने हा प्रस्ताव स्वीकारला नाही तर मला कंपनीचा एक शेअरधारक म्हणून राहताना पुनर्विचार करावा लागणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.