वीस वर्षे कष्ट, अखेर संतुष्ट
गुप्तधन पदरात पडावे या विचाराने अनेकजण अक्षरश: पछाडलेले असतात हे आपल्याला माहित आहे. तशी वृत्ते आपण अनेकदा वाचतो. कित्येकजण या गुप्तधनाच्या मोहापोटी गंभीर आणि घृणास्पद गुन्हे करण्यासही मागेपुढे पहात नाहीत. नंतर त्यांना या कृत्यांचे कायदेशीर परिणामही भोगावे लागतात.
तथापि, धातूशोधनाच्या कामात असणाऱ्या दोन व्यक्तींना अगदी कायदेशीर मार्गाने गुप्तधनाचा लाभ झाला आहे. मात्र, त्यासाठी त्यांना थोडीथोडकी नव्हे, तर 20 वर्षे सातत्याने कष्ट करावे लागले. या कष्टांमधून त्यांना 3 कोटी 42 लाख रुपयांची कमाई झाली आहे. ही घटना ब्रिटनमधील आहे. या दोन युवकांना गुप्तधनाचा शोध घेत असताना 122 मौल्यवान जुनी नाणी गवसली. ही नाणी इंग्लंड आणि नॉर्मन यांच्यातील युद्धकाळात इसवी सन 1066 मध्ये गाडण्यात आली होती. ती तांब्याची आणि चांदीची होती. हे युद्ध इंग्लंडचे राज्य मिळविण्यासाठी झाले होते आणि ते अनेक दिवस चालले. या युद्धकाळात ही नाणी गाडली गेल्याची माहिती अनेकांना होती. तथापि, नेमकी कोणत्याही स्थानी ती सापडतील याची काहीही नोंद नव्हती. ते स्थान या युवकांनी शोधून काढले.
या शोधकार्यासाठी त्यांना त्यांचे धातूशोधन शास्त्रातील ज्ञान उपयोगी पडले. एका खाणीच्या परिसरात धातूशोधन करीत असताना त्यांना या नाण्यांचा पत्ता लागला. त्यांनी तेथे खोदकाम केले असता ही 122 नाणी हाती लागली. नंतर अमेरिकेतील एका संस्थेच्या माध्यमातून त्यांचा लिलाव करण्यात आला. त्यातून या दोघांना ही 3 कोटी 42 लाख रुपयांची रक्कम वितरीत करण्यात आली आहे.