एकविसावे शतक भारत-एसिआनचे !
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे शिखर परिषदेत प्रतिपादन, लाओस येथे भव्य स्वागत
वृत्तसंस्था/लाओस
‘एकविसावे शतक हे भारताचे आणि एसियान देशांच्या संघटनेचे आहे. या संघटनेला आज जगात मोठे महत्व प्राप्त झाले असून भारताचे या संघटनेशी नजीकचे संबंध आहेत. शांततेच्या मार्गाने जगातील समस्यांवर तोडगा काढण्याचे आमचे धोरण असून भारत आणि एसिआन भविष्यकाळात एकमेकांच्या सहकार्याने मोठी प्रगती साध्य करतील, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाओस येथे एसिआन शिखर परिषदेत भाषण करताना व्यक्त केला. या परिषदेत सहभागी होण्यासाठी ते गुरुवारी लाओसला पोहचले. परिषद दोन दिवस चालणार आहे.
गुरुवारी दुपारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे लाओसच्या व्हिएनटिआन येथे आगमन झाल्यानंतर त्यांचे भव्य शासकीय स्वागत करण्यात आले. त्यांना आशीर्वाद देण्यासाठी ज्येष्ठ बुद्ध साधूंनी एका शानदार कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यकमात ते अन्य देशांच्या नेत्यांसह सहभागी झाले. भारत सरकार आणि भारतीय जनता यांच्याकडून पाली भाषेला दिल्या जाणाऱ्या सन्मानासंदर्भात बौद्ध साधूंनी समाधान व्यक्त केले. नुकताच भारताने पाली भाषेला अभिजात भाषा म्हणून परिचय दिला आहे. त्यामुळे बौद्ध साधूंना आनंद झालेला आहे.
सध्याच्या तणावाच्या वातावरणात...
सध्या जगात विविध संघर्षांमुळे तणावाचे आणि अस्वस्थ वातावरण आहे. अशा स्थितीत भारत आणि एसिआन संघटना यांच्यातील सहकार्याला अतिशय महत्व प्राप्त झाले आहे. भारत आणि एसिआनचे सर्व देश पूर्वापारपासून शांतताप्रिय आहेत. आज याच प्रवृत्तीचा प्रसार जगभरात होणे आवश्यक आहे. भारत आणि एसिआन देश एकमेकांच्या एकतेचा आणि सार्वभौमत्वाचा सन्मान करतात. आमच्या देशांमधील युवकांचे भवितव्य भक्कम व्हावे यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. भारत आणि या संघटनेच्या सदस्य देशांचे परस्परांशी संबंध आता चांगलेच दृढ झाले असून भविष्यकाळात या भूभागाच्या प्रगतीची दिशा ठरविण्याचे त्यांची क्षमता त्यांच्यात निर्माण झाली आहे, असे प्रतिपादन त्यांनी भाषणात केले.
महत्वाच्या विषयांवर चर्चा होणार
दोन दिवस चालणाऱ्या या परिषदेत आंतरराष्ट्रीय आणि विभागीय अशा अनेक महत्वाच्या विषयांवर व्यापक चर्चा केली जाणार असून संघटनेच्या आजवरच्या धोरणांचा आणि त्यांच्या परिणामांचा आढावा घेतला जाणार आहे. प्रशांत महासागर आणि दक्षिण चिनी समुद्राच्या तटावरील देशांची ही संघटना आहे. भारत या संघटनेचा प्रत्यक्ष सदस्य नसला तरी त्याला अतिथीचा दर्जा देण्यात आला असून आतापर्यंतच्या प्रत्येक परिषदेत भारताने अतिथी सदस्य म्हणून भाग घेतला आहे या परिषदेत, शांतता आणि एकात्मतेला असणाऱ्या धोक्यांसंबंधी विचार व्यक्त केले जातील. तसेच भारत आणि आसिआन देशांमधील परस्पर संबंध, द्विपक्षीय संबंध, दक्षिण चीनी समुद्रातील परिस्थिती, इत्यादी विषयांवर व्यापक चर्चा केली जाईल. म्यानमारमध्ये सध्या होत असलेले गृहयुद्ध हा ही चर्चेचा विषय असेल.
आसिआनची पंचसूत्री
आसिआन देशांच्या संघटनेने आपल्या सदस्य देशांमधील सहकार्यासाठी एक पंचसूत्री कार्यक्रम निर्माण केला आहे. भारताची या कार्यक्रमाला मनापासून मान्यता आहे. शांततावादी धोरणाच्या आधारे या पंचसूत्री कार्यमाची रचना करण्यात आली असून ती केवळ भारतासाठी किंवा आसिआनसाठी महत्वाची नसून साऱ्या जगासाठी मार्गदर्शक ठरु शकतात, असे अनेक आंतरराष्ट्रीय तज्ञांचे मत आहे.
भारताचे विशेष संबंध
आसिआनशी भारताचे विशेष संबंध आहेत, कारण भारताच्या बाहेर वास्तव्यास असणाऱ्या भारतीय नागरिकांपैकी 20 टक्के नागरिक एसिआन देशांमध्ये वास्तव्यास आहेत. हा उच्च शिक्षितांचा वर्ग असून तो संबंधित देशाच्या प्रगतीत आपली भर घालत आहे. भारत आणि एसिआन देश यांच्यात इतिहासकाळापासून नजीकचे सांस्कृतिक आणि आर्थिक संबंध आहेत. ते दृढ करणे हे दोघांसाठीही लाभदायक ठरणार आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.