ईव्ही दुचाकी बाजारात टीव्हीएस अव्वल
ओला तिसऱ्या क्रमांकावर : बजाज ऑटो दुसऱ्या स्थानी
वृत्तसंस्था/नवी दिल्ली
मे महिन्यात टीव्हीएस मोटर 25 टक्क्यांची हिस्सेदारी घेऊन पहिल्या क्रमांकावर आली आहे. इलेक्ट्रिक दुचाकी वाहन निर्माता ओला इलेक्ट्रिक विक्रीच्या बाबतीत तिसऱ्या क्रमांकावर पोहोचली आहे. कंपनीसाठी ही चिंतेची बाब आहे. वाहन पोर्टलनुसार, मे महिन्यात कंपनीची बाजारातील हिस्सेदारी 20 टक्क्यांवर आहे. गेल्या वर्षीच्या मे महिन्याच्या तुलनेत वाहनांच्या विक्रीत 60 टक्के घट झाली आहे. मे 2025 मध्ये फक्त 15,221 वाहनांची नोंदणी झाली होती, तर गेल्या वर्षी मे महिन्यात ही संख्या 37,388 होती. त्याच वेळी, टीव्हीएस मोटर 25 टक्के बाजार हिस्सेदारी घेऊन आघाडीवर आहे. बजाज ऑटो 22.6 टक्के हिस्सेदारीसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. एथर एनर्जीचा बाजारातील हिस्सा एप्रिलमधील 14.9 टक्के वरून मे महिन्यात 13.1 टक्केपर्यंत घसरला.
महाराष्ट्रातील 121 केंद्रांवर कारवाईचे निर्देश
तीन दिवसांपूर्वी महाराष्ट्रातील वाहतूक विभागाने ओलाची 121 केंद्रे बंद करण्याचे निर्देश दिले होते. वाहतूक विभागाने ओलाच्या 146 केंद्रांची तपासणी केली होती, त्यापैकी 121 हून अधिक केंद्रे व्यापार प्रमाणपत्राशिवाय चालत होती.