टीव्हीएस मोटर्सला 795 कोटी रुपयांचा निव्वळ नफा
सप्टेंबर तिमाहीचा निकाल जाहीर : वाहन विक्रीने दिला आधार
वृत्तसंस्था/मुंबई
ऑटोमोबाईल क्षेत्रातील कंपनी टीव्हीएस मोटर्सने आर्थिक वर्ष 2025-26 च्या दुसऱ्या तिमाहीचा निकाल जाहीर केला असून कंपनीने नफ्यामध्ये 42 टक्के वाढ नोंदवली आहे. सप्टेंबरला संपलेल्या दुसऱ्या तिमाहीमध्ये टीव्हीएस मोटर्सने 795 कोटी रुपयांचा नफा प्राप्त केला आहे. मागच्या वर्षी याच अवधीमध्ये पाहता कंपनीने 560 कोटी रुपयांचा निव्वळ नफा प्राप्त केला होता. यंदाच्या सप्टेंबरमध्ये संपलेल्या तिमाहीत नफा वाढण्यामागे दुचाकी आणि तिचाकीतील उच्चांकी विक्री कारणीभूत ठरली आहे. उत्सवी हंगामामध्ये ग्राहकांनी वाहनांना चांगला प्रतिसाद नोंदवला होता. मागच्या उत्सवी काळापेक्षा यावर्षी वाहन विक्री 32 टक्के वाढीव पाहायला मिळाली. याच दरम्यान सप्टेंबरला संपलेल्या दुसऱ्या तिमाहीत कंपनीचे उत्पन्न 25टक्के वाढीसोबत 14,037 कोटी रुपयांवर पोहोचले. मागच्या वर्षी याच अवधीत पाहता 11,229 कोटी रुपये इतके उत्पन्न होते. याच दरम्यान सप्टेंबरला संपलेल्या तिमाहीत 24 टक्के वाढीसह टीव्हीएस मोटर्सने 14,051 कोटी रुपयांचा महसूल प्राप्त केला आहे. मागच्या वर्षी समान अवधीत कंपनीचा महसूल 11,301 कोटी रुपयांचा होता.
विक्रीतील कामगिरी
देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये टीव्हीएसने दुचाकी आणि तिचाकी विक्रीमध्ये 23 टक्के वाढ नोंदवली. तिसऱ्या तिमाहीत पाहता कंपनीने 1.51 दशलक्ष वाहनांची विक्री केली आहे. कंपनीने सदरच्या तिमाहीत स्कूटर विक्रीत 30 टक्के वाढ नोंदवली असून 6,39,000 स्कूटर्सची विक्री करण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कंपनीची दुचाकी विक्री 31 टक्के वाढीसह 3,63,000 इतकी राहिली आहे. यामध्ये पाहता तिमाहीत 41 टक्के वाढीसह 53,000 तिचाकी विक्री करण्यामध्ये कंपनीला यश आले आहे. याच दरम्यान इलेक्ट्रिक वाहनांच्या विक्रीत सात टक्के वाढ नोंदवली गेली आहे. 80 हजार विक्रीसह सदरच्या तिमाहीमध्ये विकली गेलेली वाहन संख्या ही सर्वोच्च मानली जात आहे.
करामत आकड्यांची
- नफा 795 कोटी रुपये
- उत्पन्न 14,037 कोटी रुपये
- उत्सवी काळात 32 विक्री वाढीव
- 1.51 दशलक्ष वाहनांची विक्री
- नफा 42, उत्पन्न 25 टक्के वाढले