टीव्हीएस आयक्यूबने बनवला विक्रम, उत्पादन दहा लाखावर
वृत्तसंस्था, हैदराबाद
जानेवारी 2020 मध्ये बाजारात दाखल झालेल्या टीव्हीएसच्या इलेक्ट्रिक आयक्यूबने अलीकडेच उत्पादनामध्ये नवा विक्रम प्राप्त केला आहे. होसुर येथील उत्पादन केंद्रामध्ये दहा लाखावी उत्पादीत आयक्यूब बाहेर पडली आहे. ही कामगिरी सहा वर्षात करण्यात आली असल्याचे कंपनीने म्हटले आहे.
देशामधील सर्वात मोठी इलेक्ट्रिक दुचाकी वाहन कंपनी म्हणून टीव्हीएसची ही कामगिरी निश्चितच कौतुकास्पद म्हणायला हवी. यावर्षी मे महिन्यात 42,459 वाहनांची विक्री करण्यात आली आहे. मे 2025 मध्ये पाहता 25 हजार 804 इतकी विक्री झाली होती. त्या तुलनेमध्ये 65 टक्के यावर्षी मे मध्ये विक्री वाढली आहे.
चेतक, अॅथर अनुक्रमे दुसऱ्या, तिसऱ्या स्थानी
इलेक्ट्रॉनिक वाहनांच्या पोर्टफोलिओमध्ये संपूर्णपणे पाहता आयक्यूब ही आता सर्वाधिक विक्री होणारी गाडी ठरली आहे. इलेक्ट्रिक दुचाकींमध्ये बजाजची चेतक, अॅथर रिझटा, हिरो विदा आणि ओला यासारख्या कंपन्यांशी टीव्हीएस तगडी टक्कर देत आहे. मे महिन्यामध्ये पाहता बजाज ऑटोच्या 39 हजार 202 आणि अॅथर एनर्जीच्या 28 हजार 240 वाहनांची विक्री झाली आहे.