त्विशाच्या सासूला पाच दिवसांची कोठडी
वृत्तसंस्था/ भोपाळ
त्विशा शर्मा मृत्यू प्रकरणात सीबीआयने अटक केलेल्या सासूला म्हणजेच माजी न्यायाधीश गिरीबाला सिंग यांना शुक्रवारी भोपाळ येथील सीबीआय विशेष न्यायालयात हजर केले. सीबीआयच्या मागणीनुसार गिरीबाला सिंग यांना पाच दिवसांची कोठडी मंजूर करण्यात आली आहे. यापूर्वी त्विशाच्या पतीलाही सीबीआय कोठडी मिळाल्यामुळे आता दोघांनाही 2 जून रोजी दुपारी 2 वाजता न्यायालयात हजर केले जाणार आहे. तत्पूर्वी, दोघांचीही आमने-सामने चौकशी केली जाणार असल्याचे समजते. त्विशा शर्माने 12 मे रोजी कथितरित्या आत्महत्या केल्यानंतर हे प्रकरण देशभरात गाजत आहे.
मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने गिरीबाला सिंग यांचा अटकपूर्व जामीन रद्द केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी सीबीआयने त्यांना अटक केली. गुरुवारी सकाळी सुमारे साडेदहा वाजता सीबीआयचे एक पथक मोठ्या पोलीस बंदोबस्तात भोपाळमधील कटारा हिल्स येथील तिच्या घरी पोहोचले होते. सीबीआयच्या पथकाने तिची जवळपास सात तास चौकशी केल्यानंतर अटक केली होती. अटकेनंतर गुरुवारी सीबीआय पथकाने तिला वैद्यकीय तपासणीसाठी भोपाळमधील मौलाना आझाद नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या कॅम्पसमध्ये नेले होते. तपासासाठी मध्य प्रदेश पोलिसांकडून परवानगी घेण्यात आली होती.