गणेशोत्सवात फुलांची ५० लाखांची उलाढाल! फुलविक्रेते व उत्पादकांना बाप्पांचा आशिर्वाद
उत्सव काळात फुलांचे दरात तीनपटीने वाढ : उत्सव संपताच निम्म्याने कोसळले दर : 100 चा झेंडू 20 रूपयांवर पोहचला : आता वेध नवरात्रोत्सवाचे
इम्रान गवंडी कोल्हापूर
गेले दहा दिवस गणेशोत्सवामुळे सर्वत्र मांगल्य व चैतन्याचे वातावरण होते. याकाळात गणरायांना अर्पन करण्यासाठी विविध प्रकारच्या फुलांना मागणी वाढली होती. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ व घरोघरी पूजाअर्चा करण्यासाठी फुलांना अधिक महत्व असते. बाप्पांच्या आगमन व विसर्जन सोहळ्यात पुष्पवृष्टीही करण्यात आली. या दरम्यान, जिल्ह्यात 50 लाख रूपयांची फुलांची उलाढाल झाली असल्याची माहिती विक्रेत्यांनी दिली.
यामध्ये झेंडू, गुलाब, निशिगंध, शेवंती, पर्पल, गलाटा या फुलांना प्रामुख्याने मागणी अधिक राहीली. उत्सवकाळात रोज 3 टन फुलांची आवक होत होती. फुलांची प्रमुख बाजारपेठ असलेल्या शिंगोशी मार्केट येथून जिल्ह्यासह परजिल्ह्यातील कोकण भागातील रत्नागिरी, सिंधूदुर्ग, चिपळुन आदी ठिकाणीही निर्यात केली जात असल्याने फुलांची मोठी उलाढाल झाली.
उत्सवकाळात फुलांना मागणी वाढल्याने सर्वच फुलांचे दर तीनपटीने वाढले होते. दर वाढले असले तरी मागणीही वाढल्याने उत्पादक व विक्रेते यांच्यातन समाधन व्यक्त केले जात आहे. यंदा समाधानकारक पाऊस झाल्यामुळे फुलांचे उत्पादनही चंगले झाले. जिल्ह्यातील उदगाव, जयसिंगपूर, पेठवडगाव, शिरोळ, पट्टणकोडोली, पन्हाळा, राधानगरी, कागल परिसरातील स्थानिक उत्पादकांसह परजिल्हा व कर्नाटक, बेंगलोर परराज्यात फुलांचे चांगले उत्पादक झाल्याने आवकही वाढली होती.
पुष्पवृष्टी व 3 ते 50 फुटांपर्यंतच्या हारांना मागणी
गणेशोत्सवात घरोघरी व सार्वजनिक मंडळांकडून मोठमोठ्या गणेशमूर्तींना फुलांचे हार अर्पन केले गेले. यामध्ये 3 फुटापासून ते 50 फुटापर्यंत हारांना मागणी अधिक होती. हार बनविण्यासाठी गुलाब, निशगंध, शेवंती, झेंडू या फुलांचा अधिक वापर केला गेला. त्याचबरोबर आगमन व विसर्जन मिरवणुकीत पुष्पवृटीमुळे फुलांची लाखो रूपयांची उलाढाल झाली.
उत्सव संपताच उलाढाल थंडावली व दरही कोसळले
गणेशोत्सव काळात फुलांची लाखोंची उलाढाल झाली असली तरी उत्सव संपताच फुलाबाजारातील उलाढाल थंडावली. मागणी घटल्याने याचे दरही निम्म्याने उतरले आहेत. गणशोत्सवात 700 रूपये प्रतिकिलो असणारा निशिगंध 200 रूपये प्रतिकिलोवर कोसळला आहे. तर 100 रूपये प्रतिकिलो असणारा झेंडू 20 रूपये प्रतिकिलोवर कोसळला आहे. इतरही फुलांचे दर निम्म्याने कोसळले आहेत.
आता वेध नवरात्रोत्सवाचे
गणेशोत्सव संपताच फुलांची उलाढाल थंडावली आहे. पुढील महिन्यात 3 ऑक्टोबरला घटस्थापनेने शारदीय नवरात्रोत्सवाला प्रारंभ होणार आहे. याकाळातही फुलांना अधिक मागणी असते. त्यामळे उत्पादक व विक्रेत्यांना आत नवरात्रोत्सवाचे वेध लागले आहेत.
असे होते फुलांचे दर (प्रतिकिलोमध्ये)
फुलाचे नाव गणशोत्सवातील दर उत्सवसंपल्यानंतरचे दर
-निशिगंध 700 ते 800 रूपये 250 ते 300 रूपये
-झेंडू 100 ते 150 रूपये 20 ते 50 रूपये
-बटन गुलाब 200 ते 300 रूपये 100 ते 150 रूपये
-शेवंती 150 ते 200 रूपये 70 ते 100 रूपये
-पर्पल 250 ते 300 रूपये 100 ते 150 रूपये
गणेशोत्सव संपताच मागणी घटली
गणेशोत्सवात फुलांना मोठी मागणी होती. जिल्ह्यासह परजिल्हा व परराज्यातून फुलांची चांगली आवक झाली. उत्सवकाळात फुलांचे दरही वाढले होते. उत्सवसंपताच मागणी घटली असुन दरही निम्म्याने कोसळले आहेत.
हिंदूराव पाटील, फुल विक्रेता