500 कोटींची वाढली उलाढाल
कोल्हापूर / संतोष पाटील :
आर्थिक वर्ष अखेरचे काही आठवडे बाकी आहेत, या पार्श्वभूमीवर कर्जवाटप-वसुली-सेटलमेंट, कर्ज खात्यांचे प्रमाण राखणे, व्यवसायवृध्दी, विविध करांचा भरणा, जुन्या आर्थिक वर्षातच उलाढाल दाखवणे, वाहन-जीवन-वैद्यकीय विमा, खरेदी-विक्री या कारणाने बाजारात रोजची उलाढाल तब्बल 500 कोटी रुपयांनी वाढली आहे. 31 मार्चपर्यंत ही स्थिती राहील, असा तज्ञांचा अंदाज आहे.
कर्ज वसुली करून बँकेचा एनपीए (अनुत्पादक कर्ज) कमी राखणे तसेच व्यवसायवृद्धी करुन दिलेल्या उद्दिष्टांपर्यंत पोहोचण्याचा बँका वर्षभर प्रयत्न करत असतात. मार्च महिन्यात त्या अनुषंगाने बँकांमध्ये जोरात धांदल सुरु असते. जिह्यातील 496 बँकांचे शाखा व्यवस्थापक व कर्मचारी या अनुषंगाने महिनाभर ग्राहकांच्या थेट भेटीवर लक्ष केंद्रित करत आहेत. आरबीआयच्या धोरणानुसार दर तीन महिन्यांनी कर्जाचा आढावा होतोच. मात्र मार्च एंडींगचा जोर काही वेगळाच असतो. नव्या आर्थिक वर्षांरंभापूर्वी मागील हिशोब पूर्ण ठेवणे, नवीन वर्षासाठी आर्थिक तरतूद, कर्ज वाटप आणि ठेवींचे उद्दिष्टपुर्ते आदी कामांचा जोर बँकात दिसतो.
एक मार्चपासूनच ग्राहक सेल्स टॅक्स, एलबीटी, आयटी रिटर्न आदी कर भरणा करण्याच्या घाईत आहेत. मार्च संपेपर्यंत न थांबता 15 मार्चपर्यंतच बँकींगची कामे उरकण्याकडे ग्राहकांचा कल आहे. ग्राहकांनी बँकांतील गर्दी टाळत, ई-बँकिंगचा वापर वापर वाढवला आहे. क्रेडीट कार्ड, डेबीट कार्ड, चेक ही काय ती कॅशलेश बँकींगची असणारी परिभाषा एनईएफटी (नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर), आरटीजीएस (रिअल टाईम ग्रॉस पेमेंट सर्व्हिस), ईसीएस (इलेक्ट्रिक क्लिअरिंग सर्व्हीस) आदींचा मोठ्या प्रमाणावर वापर वाढला आहे. गेल्या काही वर्षात ऑनलाईन सेवांची चलती झाल्याने ग्राहकांची बॅंकेतील तुंबळ गर्दी कमी झाली आहे.
नव्या धोरणामुळे चेक क्लिअरींग हाऊस ही संकल्पनाच रद्दबादल ठरली. मार्च एंडिंगमुळे रोज येणाऱ्या चेकची संख्या सरासरी 30 हजार होती, ती आता 37 ते 40 हजार इतकी झाली आहे. रोजची चेकच्या माध्यमातून किमान 300 कोटींची होणारी उलाढाल वाढून ती 400 ते 450 कोटी रूपयांवर गेल्याची आकडेवारी सांगते. मायकर चेक तसेच नव्या धोरणांमुळे 24 तासांत एका खात्यावरुन दुसऱ्या खात्यावर पैसे जमा होतात. याचाही बँकेतील उलाढाल वाढण्यावर परिणाम झाला आहे. बँकेच्या खात्यावर पैसे येण्यासह धनादेश दिल्यानंतर योग्य रकमेची तत्काळ तरतूद करावी लागत आहे. जिह्यातील 617 शाखांत 35 हजार कोटींच्या ठेवी, तर 29 हजार कोटींचे कर्जवाटप बँकांतून केले जाते. मार्चअखेर सर्व कर्ज अपडेट ठेवण्याची कसरत बँकांसह ग्राहकांना करावी लागते. त्यामुळे मार्चच्या शेवटच्या आठवड्यात बॅंकांच्या उलाढालीत वाढ होत असते.
- ई बँकींग वाढले
कोल्हापूर सांगली आणि सातारा जिह्यात बँकींगशी निगडीत अंदाजे 26 लाख लोकांची सेव्हींग खाती आहेत. यातील अंदाजे तीन ते साडेतीन लाख लोकांची चालू खाती आहेत. व्यापार, उद्योगासह मॉल किंवा ई-खरेदीनिमित्त होणारा कॅशलेश व्यवहार अधिकाधिक युजर फ्रेंडली आणि तंत्रज्ञानयुक्त झाले आहे. आयएमपीएस सेवेंतर्गत स्मार्ट फोन वापरणाऱ्याला बँकींग सेवा घरबसल्या करता येऊ लागल्याने ई बँकींगचे प्रमाणात मोठी वाढ झाली.
- उसाचा हातभार
जिह्यात सरासरी 1 लाख 25 हजार टन उसाचे उत्पादन होते. सरासरी 3 हजार रुपयांप्रमाणे उसाचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होतात. ही रक्कम अंदाजे 350 ते 400 कोटींच्या घरात आहे. ही रक्कम साधारणपणे फेब्रुवारी ते मार्च महिन्यात शेतकऱ्यांच्या खात्यावर येते. येऊ घातलेली लग्नसराईवर यातील पैसा मोठ्या प्रमाणात खर्च होतो. शिवाय घराची डागडुजीपासून समारंभासाठी खर्च, जीवनावश्यक वस्तूंची खरेदी, कर्ज आणि व्याजाचा परतावा, मुदतबंद ठेवी, विमा हफ्त्यासह इतर देणी, वाहन खरेदी आदींच्या उलाढालीमध्ये शेतकऱ्यांकडे येणाऱ्या या पैशाचा वाटा खूप मोठा असतो. मार्चदरम्यान बाजारातील उलाढाल वाढण्यामागे हेही एक कारण मानले जाते.
- दृष्टीक्षेप -
18 राष्ट्रीयकृत बँका - 235 शाखा
16 खासगी बँका - 183 शाखा
जिल्हा बँकेच्या 191 शाखा
ग्रामीण बँकेच्या 8 शाखा
वार्षिक ठेवी - 35 हजार कोटी रूपये
वार्षिक कर्ज वाटप - 29 हजार कोटी रूपये