सांगलीच्या हळदीची रशिया, जपानला भुरळ; मार्केट यार्डात खरेदीसाठी परदेशी व्यापारी दाखल
सांगली प्रतिनीधी
सांगलीच्या प्रसिद्ध हळदीची आता रशिया आणि जपानलाही भुरळ पडली आहे. हळद खाण्याबरोबर औषध निर्मितीसाठीही वापर केला जात आहे. दिवसेदिवस हळदीचा वापर वाढत आहे. सांगलीतून थेट रशिया, जपानला हळद नेण्यासाठी परदेशी व्यापारी मार्केट यार्डात दाखल झाले. त्यांनी हळदीची माहिती घेतली.
येथील वसंतदादा मार्केट यार्डातील हळद सौद्यांना जपान व रशिया मास्को येथील परदेशी व्यापाऱ्यांनी भेट दिली. बाजार समितीचे सभापती सुजय शिंदे यांनी त्यांचे भारतीय रितीरिवाजाप्रमाणे स्वागत केले. परदेशी खरेदीदार, निर्यातदार, व्यापारी यांनी हळद सौदे व इतर शेतीमाल खरेदी-विक्रीबाबत सांगली बाजार समितीचे मुख्य कार्यालयात जाऊन माहिती घेतली. प्रत्यक्षात शेतीमाल सौदे यांची पाहणी केली.
दरवर्षी सांगलीतून रशियाला सुमारे पाचशे टन हळद पाठविण्यात येते. यंदा त्यापेक्षा जादा हळद नेण्याचा व्यापाऱ्यांचा प्रयत्न आहे. त्यासाठी थेट मार्केट यार्डात येवून त्यांनी माहिती घेतली. मागील दोन महिन्यांपासून हळदीचा नवीन हंगाम सुरू झाला आहे. चालूवर्षीं उत्पादन कमी झाले असल्याने हळदीचा दर वाढत आहे. यावेळी बाजार समितीचे संचालक आनंदराव नलवडे, काडाप्पा वारद, प्रशांत पाटील, सचिव महेश चव्हाण, हळद व्यापारी बाळू मर्दा, गोपाळ मर्दा, नेमानी आदी उपस्थित होते.