हळदीला विक्रमी पंचवीस हजार भाव
सांगली :
चालू हंगामातील हळदीला चांगला भाव मिळत असून सोमवारी राजापूरी लगडी हळदीला क्विंटलला पंचवीस हजार इतका विक्रमी भाव मिळाला. चोरा हळदीचे भावही वाढत असून सौदयात क्विंटलला 28 हजार इतका दर मिळाला. दरम्यान यार्डात हळदीला चांगला भाव मिळत असून शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त हळद विक्रीस आणावा, असे आवाहन बाजार समितीचे सभापती सुजयनाना शिंदे यांनी केले.
चालू हंगामातील हळदीचा हंगाम सुरू झाला आहे. येथील मार्केट यार्डात गेल्या दहा-बारा दिवसापासून नवीन हळदीच्या सौदयाला सुरूवात झाली आहे. दररोज सौदे काढण्यात येत आहेत. उताऱ्यात घट येणार असल्याने तसेच अतिपावसाने पिकाचे नुकसान झाल्याने यंदाच्या हंगामात उत्पादन घटणार असल्याचे सांगण्यात येत असल्याने हळदीला चांगला दर मिळत आहे. या आठवडयात काढण्यात आलेल्या सौदयात हळदीला विक्रमी दर मिळत आहे.
आजच्या सौदयात राजापुरी लगडी हळदीला क्विंटलला 25 हजार इतका विक्रमी भाव मिळाला. हाच मागील सौदयात 21 हजार भाव होता. चोरा हळदीलाही क्विंटलला 28 हजार दर मिळाला. मंगळवारी काढलेल्या सौदयात आठ हजार चार हळद पोत्यांची आवक झाली. सौदयात राजापुरी कणीला 12 हजार 700 ते 13 हजार 700, राजापूरी पावडर क्वालिटीला 11400 ते 16000, राजापूरी गट्टा 12500 ते 16000, देशी कडप्पा 13500 ते 14800 इतका दर मिळाला.