हळदीला रेकॉर्डब्रेक 30 हजार भाव
सांगली :
येथील सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात काढण्यात आलेल्या सौद्यात हळदीला रेकॉर्डब्रेक क्विंटलला 30 हजार रूपये इतका भाव मिळाला. सदाशिव मल्लाप्पा शिनदोळी (रा. गुरलापूर ता. मोडलगी जि. बेळगाव) या शेतकऱ्याची हळद यार्डातील व्यापारी यु. के. खिमजी अॅँड कंपनी या व्यापाऱ्यांनी विक्रमी दराने खरेदी केली.
दरम्यान विक्रमी दर मिळालेल्या हळद व्यापाऱ्याचा बाजार समिती सभापती सुजयनाना शिंदे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सचिव महेश चव्हाण, संचालक रमेश पाटील, संग्राम पाटील, काडाप्पा वारद आदी उपस्थित होते.
या हंगामातील हळद सौद्याला मार्केटयार्डात गेल्या महिन्याभरापासून सुरू झाली आहे. यार्डात आठवडयातून तीन ते चार वेळा खुल्या पध्दतीने सौदे काढण्यात येत आहेत. हंगामाची सुरूवात असल्याने आणि पीक कमी असल्याचा अंदाज आल्याने नवीन हळदीला चांगला भाव मिळत आहे. मुहुर्ताच्या सौदयात 26 हजार इतका क्विंटलला भाव मिळाला होता. यामध्ये वाढच होत असून बुधवारी काढण्यात आलेल्या सौद्यात हळदीच्या दराने विक्रम केला. बाजार समितीच्या इतिहासामध्ये प्रथमच राजापूरी हळदीला क्विंटलला 30 हजार इतका भाव मिळाला. यार्डातील बंडा बाळा फराटे या अडत दुकानात झालेल्या हळद सौद्यात सदाशिव मल्लाप्पा शिनदोळी या शेतकऱ्याची हळद यार्डातील व्यापारी यु के खिमजी अॅँड कंपनी या व्यापाऱ्यांनी विक्रमी दराने ही हळद खरेदी केली.
दरम्यान यंदा हळद उत्पादन क्षेत्रात अतिवृष्टीसह अन्य कारणांमुळे पीक कमी आहे. उत्पादनही कमी येणार असल्याने हळदीला चांगला भाव मिळत आहे, सध्या सरासरी 12 ते 15 हजार इतका भाव मिळत आहे. या दरात वाढ होण्याचा व्यापाऱ्यांचा अंदाज आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त हळद विक्रीस आणावी, असे आवाहन बाजार समितीचे सभापती सुजयनाना शिंदे व सचिव महेश चव्हाण यांनी केले आहे.