सिंधुदुर्ग जिल्ह्यात सात ठिकाणी सुरंगी वन विकसित करणार
नवकिशोर रेड्डी यांची निरवडे येथील वृक्षारोपण कार्यक्रमात माहिती
न्हावेली / वार्ताहर
सिंधुदुर्ग जिल्ह्यात सात ठिकाणी सुरंगी वन विकसित करण्यात येणार आहे.त्यासाठी आम्ही आवश्यक असलेल्या जागा निश्चित केल्या आहेत.दुर्मिळ असलेल्या सुरंगीचे जतन व्हावे आणि पुढच्या पिढीला त्याचा फायदा व्हावा यासाठी उपक्रमांतर्गत २ हजार ६०० झाडे लावण्याचा संकल्प वनविभागाकडून होत आहे.यात ग्रामपंचायत आणि शासकीय कार्यालयांना सामावून घेऊन हा उपक्रम यशस्वीपणे राबवला जाईल अशी माहिती सावंतवाडी वनविभागाचे उपवनसंरक्षक नवकिशोर रेड्डी यांनी आज येथे दिली. दुर्मिळ प्राण्यांसाठी जसा सिंधुदुर्ग जिल्हा प्रसिद्ध त्याचप्रमाणे दुर्मिळ वनस्पती सुद्धा याठिकाणी मोठ्या प्रमाणात आहेत.त्यामुळे त्या वनस्पतींचा अभ्यास आणि जतन होणे काळाची गरज आहेअसे त्यांनी सांगितले.सावंतवाडी तालुका पत्रकार संघ,सावंतवाडी वनविभाग,व निरवडे ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने आज निरवडे येथील वनविभागाच्या नर्सरीमध्ये पर्यावरण दिनाचे औचित्य साधून सुरंगीचे वृक्ष लावण्यात आले.यावेळी उपवनसंरक्षक वैभव बोराटे,आजगाव वनपाल पृथ्वीराज प्रताप,वनरक्षक प्रकाश रानगिरी,अतुल पाटील,वैशाली पवार,गोपाळ सावंत,चंद्रकांत पडते,रामदास जंगले,निरवडे सरपंच सुहानी गावडे,उपसरपंच अर्जुन पेडणेकर,तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष सचिन रेडकर,खजिनदार रामचंद्र कुडाळकर,डिजीटल मिडियाचे जिल्हाध्यक्ष अमोल टेंबकर,ज्येष्ठ पत्रकार अभिमन्यू लोंढे,हरिचंद्र पवार,रुपेश हिराप,निखिल माळकर,नरेंद्र देशपांडे,ओम टेंबकर,भुवन नाईक,सुभाष परुळेकर,हरि वारंग,दादा गावडे,सुहास पाटील,बाळा सावंत,नागेश गावडे,यशवंत पांढरे,संजय तानावडे,सुधीर माळकर,रेश्मा पांढरे,साक्षी भाईडकर,सुभद्रा कुबल,सुनिता भाईडकर,सुजाता जाधव,पूर्वा बागकर,आदी उपस्थित होते.यावेळी श्री रेड्डी पुढे म्हणाले की,राज्य शासनाच्या माध्यमातून राज्यात सुरंगी वने विकसित करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे.वनराज्यमंत्री गणेश नाईक यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविला जात आहे.दुर्मिळ अशी मानली जाणारी सुरंगी नष्ट होत आहे.त्यामुळे येणाऱ्या पिढीला त्याचे ज्ञान व्हावे जतन व्हावे हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.या पार्श्वभूमीवर राज्यात मोठ्या प्रमाणात सुरंगी झाडांची लागवड करण्यात येणार आहे.सिंधुदुर्ग जिल्ह्यात सात ठिकाणी खास सुरंगी वने विकसित करण्यात येणार आहेत.यासाठी काही स्थळे निवडण्यात आली आहेत.लवकरच त्याठिकाणी ही झाडे लावण्यात येणार आहेत.जास्तीत जास्त वृक्ष लागवड व्हावी यासाठी ग्रामपंचायतची मदत घेतली जाणार आहे.या उपक्रमाचा शुभारंभ आज सिंधुदुर्गातून सावंतवाडीत करण्यात आला.ही कौतुकाची बाब आहे.हा उपक्रम यशस्वी होण्यासाठी आम्ही निश्चित प्रयत्न करू आगामी काळात १५ ते २० वर्षात जास्तीत जास्त जिल्ह्यात सुरंगीचे वृक्ष व्हावेत यासाठी आमचे प्रयत्न सुरूच आहेत.सुरंगी हा वृक्ष अनेकांना रोजगार देणारा आहे गजरा किंवा देवासाठी ही फुले वाररली जातात तसेच ती फुले सुकल्यानंतर अत्तर बनावता येते.त्यामुळे सा फुलांमधून मोठ्या प्रमाणात आर्थिक स्रोत निर्माण होतो.तर दुसरीकडे निसर्ग संवर्धन होते.त्यामुळे हे जास्तीत जास्त वृक्षाची लागवड होण्यासाठी आमचे प्रयत्न सुरु आहेत. यावेळी निरवडे सरपंच सुहानी गावडे म्हणाल्या की,त्याठिकाणी पर्यावरण दिनाचे औचित्य साधून दरवर्षी वृक्ष लागवड करण्यात येते परंतु त्यानंतर त्या झाडाकडे कोणीच पाहत नाही या ठिकाणी अनेक लोक आपल्या जमिनी विकत आहेत प्लाटिंग करत आहेत त्यामुळे मोठ्या प्रमाणात वृक्षांचा नाश होत आहे.परंतु ही परिस्थिती बदलणे काळाची गरज आहे.अन्यथा वृक्ष नसतील तर त्याचा मोठा फटका पुढच्या पिढीला भोगावे लागेल त्यामुळे सर्वांनी वृक्ष लागवड करण्यासाठी आणि जास्तीत जास्त झाडे लावण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहेत.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हरिशचंद्र पवार तर आभार सचिन रेडकर यांनी मानले.