For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

तेलंगणात बोगदा दुर्घटना; 6 ते 8 कामगार अडकले

06:55 AM Feb 23, 2025 IST | Tarun Bharat Portal
तेलंगणात बोगदा दुर्घटना  6 ते 8 कामगार अडकले
Advertisement

बचावकार्यासाठी लष्कराची मदत : प्रवेशद्वारापासून 14 किमी अंतरावर 3 मीटरचा भाग कोसळला

Advertisement

वृत्तसंस्था/ हैदराबाद

तेलंगणातील नागरकुर्नूल जिल्ह्यात एसएलबीसी (श्रीशैलम लेफ्ट बँक कॅनाल) बोगदा प्रकल्पाचा काही भाग कोसळल्यामुळे मोठी दुर्घटना घडली. या अपघातात  6 ते 8 कामगार बोगद्यात अडकल्याची माहिती उपलब्ध झाली असून त्यांच्या बचावासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. प्रकल्प अधिकाऱ्यांकडून मदत व बचावकार्यासाठी लष्कराचे सहाय्य मागविण्यात आले आहे. बोगद्याच्या प्रवेशद्वारापासून आत 14 किमी अंतरावर भूस्खलन झाल्यामुळे हा अपघात घडल्याचे सांगितले जात आहे.

Advertisement

बोगदा मार्गातील छताचा सुमारे तीन मीटर भाग कोसळला आहे. या बोगद्याचे काम बराच काळ थांबले होते. चार दिवसांपूर्वीच काम पुन्हा सुरू झाले. याचदरम्यान शनिवारी सकाळी भूस्खलन झाल्यामुळे कामगार अडकले आहेत. घटनेची माहिती मिळाल्यानंतर सिंचन प्रकल्पावर काम करणाऱ्या कंपनीच्या दोन बचाव पथकांनी घटनास्थळी धाव घेतली. कंपनीच्या म्हणण्यानुसार, घटनेच्या वेळी 50 कामगार घटनास्थळी उपस्थित होते. यापैकी 43 जण सुरक्षित बाहेर आले आहेत. उर्वरित कामगार कोसळलेल्या मातीच्या ढिगाऱ्याच्या दुसऱ्या बाजूला अडकल्याची माहिती नागरकुर्नूलचे पोलीस अधीक्षक वैभव गायकवाड यांनी दिली.

तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी या घटनेवर दु:ख व्यक्त केले आहे. मुख्यमंत्री कार्यालयाच्या म्हणण्यानुसार, जिल्हाधिकारी, अग्निशमन दल आणि पाटबंधारे विभागाचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले आहेत आणि मदत आणि बचावकार्यात गुंतले आहेत. ‘श्रीशैलम ते देवरकोंडा या बोगद्याच्या 14 किलोमीटर अंतराच्या इनलेटवर (डोमलापेंटा जवळ) सांडपाण्यावर प्लास्टर केलेले काँक्रीट घसरल्याने हा अपघात झाला,’ असे रस्ते आणि इमारती मंत्री कोमातीरेड्डी वेंकट रेड्डी यांनी एका निवेदनात म्हटले आहे.

केटीआर यांचा काँग्रेस सरकारवर हल्लाबोल

बीआरएसचे कार्यकारी अध्यक्ष केटी रामा राव (केटीआर) यांनी मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्यावर निशाणा साधला आहे. तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी एसएलबीसी बोगदा अपघाताची संपूर्ण जबाबदारी घ्यावी. ऑगस्ट 2024 मध्ये सुनकिशाला येथे संरक्षक भिंत कोसळण्याची घटना घडली होती. त्यानंतर आता ही दुर्घटना घडली आहे. यावरून काँग्रेस सरकारचे अपयश स्पष्ट होते, असा हल्लाबोल केटीआर यांनी केला आहे. कालेश्वरम प्रकल्पादरम्यान बॅरेजचा खांब कोसळला तेव्हा काँग्रेस नेत्यांनी खूप गोंधळ घातला होता, आता जेव्हा त्यांच्या सरकारमध्ये असे अपघात सतत घडत आहेत, तेव्हा ते काय म्हणतील? असा प्रश्नही केटीआर यांनी उपस्थित केला.

यापूर्वी 1 ऑगस्ट 2024 रोजी तेलंगणातील नागार्जुनसागर धरणाजवळील सुनकीसला येथे एक रिटेनिंग वॉल कोसळली. भारत राष्ट्र समितीने (बीआरएस) या अपघातासाठी काँग्रेस सरकारला जबाबदार धरले आणि न्यायालयीन चौकशीची मागणी केली. तर काँग्रेसने प्रत्युत्तर देत हा प्रकल्प बीआरएसच्या काळात 2,215 कोटी रुपये खर्चून बांधण्यात आला होता आणि निकृष्ट दर्जामुळे भिंत कोसळल्याचा दावा केला होता.

Advertisement
Tags :

.