तुंगमध्ये बिबट्याचा धुमाकूळ; गोठ्यात शिरून वासराचा घेतला बळी; शेतकऱ्यांत चिंता
तुंग : सांगली जिल्ह्यातील तुंग गाव परिसरात बिबट्याचा वावर पुन्हा एकदा समोर आला असून, तुंग-कवठेपिरान मार्गावरील एका गोठ्यात शिरून बिबट्याने वासरावर हल्ला केल्याची घटना घडली. या हल्ल्यात वासराचा मृत्यू झाला. ही घटना सत्यजित जयपाल टकुडगे यांच्या गोठ्यात घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, रात्रीच्या सुमारास बिबट्याने गोठ्यात प्रवेश करून वासरावर हल्ला केला. सकाळी ही घटना निदर्शनास आल्यानंतर परिसरातील नागरिकांना याची माहिती मिळाली.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी तुंग परिसरातील विष्णू वाईंगडे यांच्या पाण्याच्या टाकीजवळील घरातील कुत्र्यावरही बिबट्याने हल्ला केल्याची घटना घडली होती. त्यानंतर आता गोठ्यातील वासराचा बळी गेल्याने परिसरात बिबट्याच्या वावराबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.
तुंग-कवठेपिरान मार्ग परिसरात मोठ्या प्रमाणात शेती असून, अनेक शेतकऱ्यांचे गोठे शेतालगत किंवा घरांपासून काही अंतरावर आहेत. त्यामुळे रात्रीच्या वेळी जनावरे तसेच शेतकरी आणि नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
सलग घडलेल्या घटनांच्या पार्श्वभूमीवर वनविभागाने तातडीने परिसराची पाहणी करून बिबट्याच्या हालचालींचा मागोवा घ्यावा, आवश्यक ठिकाणी कॅमेरे बसवावेत आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे.
पशुपालकांनी रात्रीच्या वेळी गोठ्यांमध्ये पुरेशी प्रकाशव्यवस्था ठेवावी, जनावरे सुरक्षित ठिकाणी बांधावीत आणि रात्री एकट्याने बाहेर पडणे टाळावे, असे आवाहनही करण्यात येत आहे.
कुत्र्यावर हल्ल्यानंतर आता वासरावर हल्ला झाल्याने तुंग परिसरातील बिबट्याच्या वावराचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. वनविभागाच्या पुढील कारवाईकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.