सनई-चौघड्याच्या सुरात तुळशी विवाह उत्साहात
पुजाऱ्याच्या साक्षीने विधीवत पूजा : विवाहानंतर प्रचंड आतषबाजी
कोल्हापूर :
सनई-चौघड्यांच्या सुरात मंगलाष्टकांच्या गजरात आणि प्रचंड उत्साहात बुधवारी सर्वत्र तुलशी विवाह सोहळा सायंकाळी सात ते रात्री आठ वेळेत पार पडला. शहरात आतषबाजी केल्याने संपूर्ण आसमंत उजळून निघाले होते.
दीपोत्सवातील अखेरचा सण म्हणजे तुळशी विवाह दरवर्षीप्रमाणे यंदाही घरोघरी तुळशी वृंदावनाभोवती उसांची मांडणी करून आकर्षक रांगोळी काढली होती. तसेच तुळशी वृंदावनावर विद्युत रोषणाई केली होती. त्यानंतर तुळशी वृंदावनामध्ये हिरव्या चुड्यासह चिंच, ओटी, आवळे, हळदी, कुंकु, फणी आदींसह विधीचे साहित्य ठेवून श्रीकृष्णाची मूर्ती विराजमान केली. घरातील कर्त्या मंडळींनी ठरविलेल्या वेळेवर विवाह सोहळा साजरा केला. विवाह सोहळ्यावेळी ज्येष्ठ नागरिकांसह भटजींनी मंगलाष्टका म्हंटल्या. काही ठिकाणी तर यूट्यूबवर ऑनलाईन मंगलाष्टका लावून सोहळा साजरा केला. विवाहानंतर आरती म्हणून दहीभाताचा व फराळाचा नैवद्य दाखवला. शहरातील नागरिकांनी सोहळयाचा क्षण आपल्या मोबाईलमध्ये टीपले. दरम्यान अंबाबाई मंदिराबाहेर विवाह सोहळा उत्साहात पार पडला, येथील विधीवत पुजेनंतर भाविकांनी दर्शन व प्रसादाचा लाभ घेतला.
डांगे गल्लीत सामुदायिक तुळशी विवाह सोहळ्याची परंपरा कायम
डांगे गल्ली येथील सर्वच घरांनी सामुदायिक तुळशी विवाह सोहळ्याची परंपरा कायम ठेवली. कॅराओकेच्या सहाय्याने मंगलाष्टका म्हणून सोहळा पार पडला. मंगलाष्टका झाल्यानंतर प्रत्येकाने आपआपल्या तुलसी वृंदावनाची पूजा केली. गल्लीतील सर्व घरे विद्युत रोषणाईने उजळून गेली होती. लहान मुले आणि महिलांचा सहभाग लक्षणीय होता. सोहळा संपल्यानंतर सेल्फीचा मोह नागरिकांना आवरला नाही.