Tulashi Dam: 'तुळशी' जलाशय 77 टक्के भरला, 500 क्युसेकने पाण्याचा विसर्ग सरु
तुळशी नदीपात्राच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे
धामोड : गेल्या महिनाभरापासून येथील तुळशी जलाशय परिसरात पावसाचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे जलाशय ७७ टक्के इतका भरला आहे. जलाशयाच्या तीन वक्र दरवाजातून प्रतिसेकंद ५०० क्युसेक्शने पाणी तुळशी नदीपात्रात सोडण्यात आले आहे. त्यामुळे तुळशी नदीपात्राच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे.
ग्रामपंचायत सदस्य एन. जी. नलवडे यांच्या हस्ते धार्मिक विधी व पाण्याचे पूजन झाल्यानंतर पाणी सोडण्यात आले. यावेळी शाखा अभियंता अंजली कारेकर , स्थापत्य अभियंता भालचंद्र कापसे, उपसरपंच नेत्रांजली कोरे, माजी उपसरपंच मारुती तामकर, ग्रा.पं. सदस्य संदीप नलवडे, विश्वास गुरव, तुषार बोडके, कर्मचारी पांडुरंग मगदूम, सुभाष पाटील, ईश्वरा पाटील, आदिनाथ देंगे आदी उपस्थित होते.
३.४७ टीएमसी पाणीसाठा असणाऱ्या तुळशी जलाशयात सध्या २.६७ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. ६१६.९१ मीटर पाणी पातळी असणाऱ्या जलाशयाची सध्या ६१२. २७ मीटर पाणीपातळी झाली आहे. मागील चोवीस तासात ७० मिमी इतक्या पावसाची नोंद झाली आहे. तर जूनपासून आज अखेर १७९२ मिमी इतका पाऊस झाला आहे.
शिवाय केळोशी लपा तलावाच्या उजव्या सांडव्यातून १५० क्युसेक इतका विसर्ग तुळशी जलाशयात सुरु आहे. मागील वर्षी ८ जुलै अखेर ११४२ मिमी पाऊस होऊन जलाशयात ४९ टक्के इतका पाणीसाठा होता. सध्या जलाशय ७७ टक्के इतके भरल्याने पाणीपातळी नियंत्रित ठेवण्यासाठी प्रशासनाने जलाशयातून ५०० क्युसेक्शने पाणी सोडले आहे.