Tulja Bhavani Temple: तुळजाभवानीचे नवरात्र राज्य महोत्सव, जिल्हाधिकाऱ्यांच्या प्रयत्नाला यश
तुळजाभवानीचे प्रसिद्ध असे प्राचीन मंदिर देशभर प्रसिद्ध आहे
तुळजापूर : महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांपैकी एक पीठ म्हणजेच श्री तुळजाभवानी देवीचे मंदिर आहे. तुळजाभवानी देवी नवरात्र महोत्सवास मंदिर संस्थांचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी कीर्तीकिरण पुजार यांच्या प्रयत्नामुळे राज्याच्या प्रमुख महोत्सवाचा दर्जा देण्यात आला आहे.
नवरात्र महोत्सवाचा पर्यटन विभागामार्फत 25-26 या वित्तीय वर्षात आयोजित करण्यात येणाऱ्या महोत्सवाच्या दिनदर्शिकेमध्ये समावेश करण्यात आला आहे. तुळजाभवानीचे प्रसिद्ध असे प्राचीन मंदिर देशभर प्रसिद्ध आहे. आई तुळजाभवानीकडून छत्रपती शिवाजी महाराजांना भवानी तलवार देण्यात आल्याबाबतची आख्यायिका प्रसिद्ध आहे.
शारदीय नवरात्र महोत्सवात 10 दिवसांत या ठिकाणी महाराष्ट्रासह कर्नाटक व तेलंगणा राज्यासह देशातील विविध भागांमधून सुमारे 50 लाख भाविक दर्शनासाठी येतात. या काळात तुळजापूर शहर धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक रंगांनी न्हाऊन निघते. राज्यातील पर्यटनाला चालना देऊन राज्यातील पर्यटनस्थळांची राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर व्यापक प्रमाणावर प्रसिद्धी व प्रचलन केले जाते.
देशी-विदेशी पर्यटकांना मोठ्या प्रमाणावर आकर्षित करण्यासाठी पर्यटन विभागामार्फत 2025-26 या वित्तीय वर्षात आयोजित करण्यात येणाऱ्या महोत्सवाची दिनदर्शिका प्रकाशीत करण्यात आली आहे. श्री क्षेत्र तुळजापूर येथून थोड्याच अंतरावर नळदुर्ग किल्ला, तेर येथील संत गोरोबाकाका प्राचीन मंदिर, येरमाळा येथील येडेश्वरी मंदिर, येडशी येथील रामलिंग अभयारण्य, परंडा भुईकोट किल्ला आदी पर्यटनाच्या दृष्टीने प्रेक्षणीय अशी धार्मिक व पर्यटनस्थळे आहेत.
भाविकांच्या संख्येत वाढ होईल ?
"तुळजाभवानी मंदिर संस्थांनी शासनाकडे प्रस्ताव पाठवला होता. जिल्हाधिकारी यांच्या प्रयत्नांमुळे त्याला मंजुरी मिळाली. व्यापक प्रसिद्धीसाठी मंदिर कमी पडत होते, पण आता राज्याचा प्रमुख महोत्सवाचा दर्जा मिळाला असल्यामुळे पर्यटन विभागाकडून मंदिर संस्थानला त्याचा मोठ्या प्रमाणात लाभ होणार आहे. दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या संख्येत देखील वाढ होईल."
- अरविंद बोळंगे, तहसीलदार तथा विश्वस्त, तुळजाभवानी मंदिर संस्थान