पंगत आयोजकांनो सावधान! सात दिवस आधी परवानगी घ्या; तुकाराम मुंढेंचा नवा आदेश
मुंबई : अन्न आणि औषध प्रशासनाचे (FDA) आयुक्त तुकाराम मुंढे यांनी अन्नसुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आता मोठ्या प्रमाणावर जेवणाची पंगत किंवा सामुदायिक भोजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यापूर्वी प्रशासनाची परवानगी घेणे आवश्यक करण्यात आले आहे. या निर्णयामुळे लग्नसमारंभ, धार्मिक कार्यक्रम, सामाजिक उपक्रम तसेच अन्य मोठ्या कार्यक्रमांमध्ये अन्न तयार करणाऱ्या आयोजकांवर जबाबदारी निश्चित होणार आहे.
नव्या आदेशानुसार, पंगत आयोजित करण्याच्या किमान सात दिवस आधी संबंधित प्रशासनाकडे परवानगीसाठी अर्ज करावा लागणार आहे. कार्यक्रमात किती लोकांसाठी जेवण तयार केले जाणार आहे, अन्न तयार करण्याची व्यवस्था कुठे आहे, स्वच्छता तसेच अन्न हाताळणीची व्यवस्था कशी आहे, याची माहिती आयोजकांना द्यावी लागणार आहे.
अन्नाची गुणवत्ता आणि स्वच्छता याबाबत कोणतीही तडजोड होऊ नये, तसेच मोठ्या प्रमाणावर तयार होणाऱ्या अन्नामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ नये, हा या निर्णयामागील प्रमुख उद्देश असल्याचे सांगितले जात आहे.
या आदेशामुळे मोठ्या पंगती, सामुदायिक भोजन आणि विविध सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये अन्नसुरक्षा नियमांचे पालन अधिक काटेकोरपणे होण्याची शक्यता आहे. आयोजकांनी वेळेत परवानगी घेऊन आवश्यक नियमांचे पालन करणे अपेक्षित आहे.