For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सेलिब्रिटी जाहिरातींवर राष्ट्रपतींचे भाष्य; तुकाराम मुंढेंनीही दिला जबाबदारीचा इशारा

02:03 PM Sep 24, 2026 IST | Tarun Bharat Portal
सेलिब्रिटी जाहिरातींवर राष्ट्रपतींचे भाष्य  तुकाराम मुंढेंनीही दिला जबाबदारीचा इशारा
Advertisement

मुंबई : लोकप्रिय कलाकारांचा समाजावर, विशेषतः तरुणाईवर मोठा प्रभाव असतो. त्यामुळे आरोग्यासाठी हानिकारक उत्पादनांचे समर्थन किंवा जाहिरात करताना सेलिब्रिटींनी आपल्या सामाजिक जबाबदारीची जाणीव ठेवावी, असे मत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी व्यक्त केले. गुजरातमधील एकतानगर येथे झालेल्या 72व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात त्यांनी हा मुद्दा उपस्थित केला.

Advertisement

राष्ट्रपती मुर्मू यांनी लोकप्रिय कलाकारांना आरोग्यासाठी हानिकारक उत्पादनांचे समर्थन न करण्याचे आवाहन केले. त्यांच्या मते, यशस्वी कलाकारांच्या संदेशाचा प्रभाव लाखो मुले आणि तरुणांवर पडतो. त्यामुळे कलाकारांनी आपल्या प्रभावाचा वापर समाजहितासाठी करावा. ‘प्रकाश पसरवतो तोच खरा स्टार; अंधार पसरवणारा स्टार होऊ शकत नाही,’ असा संदेश त्यांनी दिला.

राष्ट्रपतींच्या या भूमिकेला महाराष्ट्राच्या अन्न व औषध प्रशासनाचे (FDA) आयुक्त तुकाराम मुंढे यांनीही समर्थन दिले. त्यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे सेलिब्रिटींच्या जाहिराती आणि त्यांच्या सामाजिक जबाबदारीचा मुद्दा अधोरेखित केला. ‘Influence is not immunity’, म्हणजेच प्रसिद्धी किंवा प्रभावामुळे कायद्यापासून सूट मिळत नाही, असा संदेश मुंढे यांनी दिला.

Advertisement

मुंढे यांनी स्पष्ट केले की, कलाकारांना मोठ्या प्रमाणावर लोक प्रभावित होत असतील, तर त्या प्रभावासोबत जबाबदारीही येते. एखादे उत्पादन, वर्तन किंवा सवय सार्वजनिक आरोग्यासाठी हानिकारक असेल, तर त्याचे समर्थन किंवा जाहिरात करण्यापूर्वी त्याच्या परिणामांचा विचार केला पाहिजे, अशी त्यांची भूमिका आहे.

या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र FDAने काही सेलिब्रिटींच्या जाहिरातींवर घेतलेल्या भूमिकेचीही चर्चा होत आहे. FDAने शाहरुख खान, अजय देवगण आणि टायगर श्रॉफ यांना ‘विमल इलायची’च्या जाहिरातीसंदर्भात कारणे दाखवा नोटिसा बजावल्या आहेत. संबंधित जाहिरात सरोगेट प्रमोशनच्या नियमांत येते का, याबाबत FDAने प्रश्न उपस्थित केले आहेत.

मुंढे यांच्या भूमिकेनुसार, सेलिब्रिटी असणे ही कायदेशीर जबाबदारीपासून मुक्त होण्याची बाब नाही. उत्पादनांची जाहिरात करताना कायद्याचे पालन आणि ग्राहकांच्या आरोग्याचा विचार करणे आवश्यक आहे. राष्ट्रपतींच्या वक्तव्यानंतर हा मुद्दा पुन्हा चर्चेत आला असून, सेलिब्रिटी जाहिराती आणि सार्वजनिक आरोग्य यांच्यातील संबंधावर नव्याने चर्चा सुरू झाली आहे.

Advertisement
Tags :

.