Kolhapur : ज्ञानोबा-तुकारामच्या गजरात तुकाराम महाराज पालखी सोहळा उत्साहात
अभंग-भजनांच्या स्वरांनी कोल्हापूर दुमदुमला
कोल्हापूर : अभंग-भजनांची बरसात, रामकृष्ण नामाचा अखंड जप, ज्ञानोबा, माऊली तुकारामचा गजर अशा वातावरण रविवारी जगत्गुरु श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळा साजरा करण्यात आला. सात तास सुरु राहिलेल्या या पालखी सोहळ्यात तीन हजारावर वारकरी सांप्रदाय व भाविक सहभागी झाले होते. कार्तिक शुद्ध एकादशीच्या -औचित्यावर प्रथमच आयोजित केलेल्या या सोहळ्यातील पालखीत संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर व जगत्गुरु तुकाराम महाराजांची मूर्ती विराजमान केल्या होत्या. तुकाराम महाराजांच्या पादुकाही पालखीत ठेवल्या होत्या.
शिवाजी पेठ, साकोली कॉर्नर येथील श्रीगुरु रामचंद्र महाराज यादव मठीच्या वतीने मिरजकर तिकटीजवळील विठ्ठल मंदिर येथून जगत्गुरु श्री संत तुकाराम महाराज सोहळ्याला सुरुवात करण्यात आली. मठीचे प्रमुख महादेव महाराज यादव यांच्या हस्ते पालखीतील ज्ञानेश्वर व तुकाराम महाराजांची मूर्तीचे पूजनकेले. यानंतर हुपरीहून मागललेल्या विशेष रथात पालखी विराजमान करुन प्रतिपंढरपूर नंदवाळकडे सर्वांनी प्रस्थान केले. पालखी विराजमान असलेल्या रथासोबत अन्य दोन रथही होते.
यापैकी एका रथात रामचंद्र महाराज यादव यांची तर दुसऱ्या रथात विठ्ठल रुक्मिणीची प्रतिमा विराजमान केली होती. रथांसोबत दोन घोडे, दोन उंट, नगारा, दिंड्या पताका खांद्यावर घेतलेले वारकरी, २० विणेकर, दोन हजारावर टाळकरी, ६ बैलगाड्या, सव्वाशेहून अधिक तुळशी वृंदावन डोक्यावर घेतलेल्या महिला, गोंधळी, वासुदेव, एक हजारावर भाविक असा लवाजमा होता. ह्या सर्व लवाजम्याने नंदवाळमधील विठ्ठल भेटीच्या ओढीने अभंग, भजने म्हणत, रामकृष्ण नामाचा अखंड जप करत आणि ज्ञानोबा, माऊली, तुकारामचा गजर करत बिनखांबी गणेश मंदिराकडे प्रस्थान केले.
येथून हा लवाजमा निवृत्ती चौकमार्गे खंडोबा तालीमजवळ पोहोचला तालमीसमोर उभे रिंगण सोहळा साजरा केला. या रिंगणातून दोन अश्वांनी ३ फेऱ्या मारुन रिंगण सोहळा पूर्ण केला. यानंतर पालखी व लवाजम्याने जुना वाशीनाकाकडे प्रयाण केले. येथून हा लवाजमा क्रशर चौक, सानेगुरुजी वसाहत, नवीन वाशी नाका या मार्गावरुन पुईखडीवरील मोकळ्या मैदानात गेला. येथेही गोलरिंगण सोहळा साजरा केला. तत्पूर्वी अभंग, भजने म्हणत पुईखडीचा परिसर दुमदुमून सोडला.