शिकवणी केंद्रे आहेत मृत्यूचा सापळा!
तीन विद्यार्थ्यांच्या मृत्यूची सर्वोच्च न्यायालयाकडून स्वत:हून दखल
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
काही शिकवणी केंद्रे ही मृत्यूचा सापळा झाली आहेत, अशी कठोर टिप्पणी सर्वोच्च न्यायालयाने केली आहे. दिल्लीत एका शिकवणी केंद्रात शिकणारे तीन विद्यार्थी काही दिवसांपूर्वी तळघरातील वाचनालयात पाणी शिरलेल्या बुडून मृत्युमुखी पडली होती. या घटनेची नोंद सर्वोच्च न्यायालयाने स्वत:हून घेतली असून केंद्र सरकार आणि दिल्ली सरकारला या संदर्भात नोटीस पाठविली आहे.
दिल्लीतील जुन्या राजिंदर नगरात ही घटना घडली होती. सर्वोच्च न्यायालयाने या घटनेची नोंद स्वत:च्या अधिकारात करुन घेताना अशा शिकवणी केंद्रावर कारवाई करण्याची आवश्यकता प्रतिपादित केली आहे. अशा केंद्रांनी सुरक्षितेच्या नियमांचे पालन काटेकोरपणे करण्याची आवश्यकता आहे. अनेक शिकवणी केंद्रांमध्ये विद्यार्थ्यांच्या किमान सुरक्षेचाही विचार केला जात नाही, ही स्थिती भयावह आहे, अशी टिप्पणी न्या. सूर्यकांत आणि न्या. उज्ज्वल भुयान यांच्या खंडपीठाने केली असून केंद्र आणि दिल्ली सरकारकडून उत्तर मागविले आहे.
शिकवणी केंद्रावर बंदी
ही घटना घडल्यानंतर तिचे तीव्र पडसाद उमटले आहेत. या केंद्रावर त्वरित बंदी घालण्यात आली असून तेथे चालणाऱ्या सर्व शिकवण्या थांबविण्यात आल्या आहेत. पुढील आदेशाप्रमाणे केंद्र बंद राहील असा आदेश प्रशासनाकडून काढण्यात आला आहे. हा आदेश उठवावा कारण अनेक विद्यार्थ्यांची हानी केंद्र बंद राहिल्याने होऊ शकते, असे या शिकवणी केंद्र चालविणाऱ्या व्यवस्थापनाचे म्हणणे होते. तथापि, सुरक्षेची पूर्ण व्यवस्था झाल्याशिवाय केंद्र सुरु होऊ नये. तोपर्यंत केंद्र आपल्या विद्यार्थ्यांना ऑन लाईन प्रशिक्षण देऊ शकेल, असे न्यायालयाने स्पष्ट केले.
सीबीआयकडे चौकशी
या प्रकरणाची चौकशी दिल्ली पोलिसांकडून काढून घेऊन सीबीआयकडे देण्यात यावी, असा आदेश दिल्ली उच्च न्यायालयाने शनिवारी दिला आहे. त्यानुसार आता चौकसी सीबीआयकडे देण्याची तयारी पोलिसांनी चालविली आहे. दिल्ली उच्च न्यायालयाने राज्य पोलिसांवर तपास गांभीर्याने न केल्यासाठी ताशेरे झाडले.
विद्यार्थ्यांचे आंदोलन
शिकवणी केंद्रात घडलेल्या या दुर्घटनेचा निषेध करण्यासाठी आणि न्यायाच्या मागणीसाठी दिल्लीत अनेक विद्यार्थी संघटनांनी आंदोलनाला प्रारंभ केला आहे. काही शिकवणी केंद्रांनी विद्यार्थ्यांच्या निवासाची सोय केली आहे. तथापि, खोल्यांचे भाडे प्रचंड प्रमाणात आकारले जाते. तसेच एव्हढे भाडे देऊनही अनेक पायाभूत सुविधाही विद्यार्थ्यांना मिळत नाहीत, अशी आंदोलनकर्त्यां विद्यार्थ्यांची तक्रार आहे. दिल्ली सरकार आणि केंद्र सरकारने लक्ष घालण्याचे आश्वासन दिले आहे.
5 कोटीच्या भरपाईची मागणी
शिकवणी केंद्राच्या तळघरात बुडून जीव गमावलेले विद्यार्थी बुद्धीमान होते. त्यांची आतापर्यंतची शैक्षणिक कामगिरी उत्कृष्ट होती. त्यांचे करिअर या घटनेमुळे अर्ध्यावरच संपले. त्यांच्या कुटुंबियांना प्रत्येक मृत विद्यार्थ्यामागे 5 कोटी रुपयांची भरपाई देण्यात यावी, अशी मागणीही आंदोलक विद्यार्थी करीत आहेत.