तुहिन कांत पांडे सेबीचे नवे प्रमुख
तीन वर्षांचा कार्यकाळ राहणार : माधवी बुच यांच्या जागी नियुक्ती
नवी दिल्ली :
केंद्र सरकारने वित्त सचिव तुहिन कांत पांडे यांची सिक्युरिटी अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) चे प्रमुख म्हणून नियुक्ती जाहीर केली आहे. तुहिन पुढील 3 वर्षांसाठी हे पद भूषवतील. ते 28 फेब्रुवारी रोजी निवृत्त होणाऱ्या सेबीच्या प्रमुख माधवी पुरी बुच यांची जागा घेणार आहेत. तुहिन कांत पांडे हे 1987 च्या बॅचचे ओडिशा कॅडरचे आयएएस अधिकारी आहेत. ते मोदी 3.0 सरकारमधील भारतातील सर्वात व्यस्त सचिवांपैकी एक आहेत. ते सध्या केंद्र सरकारमधील चार महत्त्वाचे विभाग हाताळत आहेत. 7 सप्टेंबर 2024 रोजी त्यांची अर्थ सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली.
अर्थ मंत्रालयाने 27 जानेवारी रोजी नवीन अध्यक्षांच्या नियुक्तीसाठी अर्ज मागवले होते. बुच यांचा कार्यकाळ 3 वर्षांचा होता. त्यांनी 2 मार्च 2022 रोजी अजय त्यागी यांची जागा घेतली. बुच 2017 ते 2022 पर्यंत सेबीच्या पूर्णवेळ सदस्य होत्या. माधवी पुरी बुच त्यांच्या कडक स्वभावासाठी ओळखल्या जातात. नवीन सेबी प्रमुखांना 5.62 लाख पगार मिळेल.
बुच यांची कारकिर्द
माधवी बुच बुच यांनी 1989 मध्ये आयसीआयसीआय बँकेतून त्यांच्या कारकिर्दीची सुरुवात केली. 2007 ते 2009 पर्यंत त्या आयसीआयसीआय बँकेत कार्यकारी संचालक होत्या. फेब्रुवारी 2009 ते मे 2011 पर्यंत त्या आयसीआयसीआय सिक्युरिटीजच्या व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ होत्या.