जांबोटीचा मंगळवारचा बाजार रामापूर पेठेतच भरला जावा
व्यापाऱ्यांनी दिले ग्रामपंचायतीला निवेदन
वार्ताहर/कणकुंबी
खानापूर तालुक्याच्या पश्चिम भागातील केंद्रस्थानी असलेल्या जांबोटी येथील रामापूर पेठ येथे ब्रिटिश काळापासून मंगळवारच्या दिवशी बाजार भरत असतो, परंतु गेल्या काही वर्षापासून बाजारपेठेमध्ये बाजार भरण्याऐवजी चर्चपासून बस स्टॅन्डपर्यंत बाजार भरत आहे. त्यामुळे रामापूर पेठ येथील बाजारपेठेतच बाजार भरावा, अशी मागणी जांबोटीतील स्थानिक व्यापाऱ्यांनी ग्रामपंचायतीकडे निवेदनाद्वारे केली आहे. ब्रिटिश काळापासून मंगळवारी बाजार भरत आहे. पूर्वी सदर बाजार रामापूर पेठेतच भरला जात असे. यापूर्वी बाजारपेठेमध्ये जवळपास पंधरा वीस किराणा दुकानदार तसेच कपड्यांची व इतर सर्व प्रकारची दुकाने घेऊन व्यापारी बाजारपेठेमध्येच बसत. त्यामुळे जांबोटी-रामापूर पेठला फार महत्त्व होते. परंतु काही वर्षापासून बाहेरगावाहून येणाऱ्या व्यापाऱ्यांनी बाजारपेठेकडे पाठ फिरविली आहे. आपल्या सोयीस्कर व नागरिकांच्या सोयीसाठी म्हणून जांबोटी बस स्टॅन्डपासून चर्चपर्यंतच्या रस्त्यावर ठिकठिकाणी बसत असल्याने बाजारपेठेतील किराणा व्यापाऱ्यांना मोठा फटका बसला आहे.
व्यापाऱ्यांवर उपासमारीची वेळ
बस स्टॅन्डवरच अनेक किराणा दुकाने आहेत. तसेच बाहेरुन येणारे सर्व व्यापारी देखील बाजार पेठेऐवजी चर्चपर्यंतच्या रस्त्यावर बसत असल्याने नागरिकही बाजारपेठेत जाणे टाळत आहेत. त्यामुळे बाजारपेठेतील किराणा व्यापाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. या मुख्य रस्त्यावर वर्दळ असल्याने वाहन धारकांना या अनधिकृत बाजाराचा त्रास होत आहे. ग्राम पंचायत कार्यालय, कॉलेज, वनखाते, महसूल खाते, पोलीस स्टेशन व इतर अनेक शासकीय कार्यालये असल्याने तसेच कापोली, चापोली ही गावे असल्याने रस्त्यावर नेहमी वर्दळ असते. त्यामुळे बाजार भरण्यास देखील समस्या निर्माण होत आहे.
व्यापाऱ्यांना बाजारपेठेत बसण्याची सक्ती करा
यापूर्वी देखील रामपूर पेठ येथील व्यापाऱ्यांनी बाजार पेठेतच बाजार भरविण्यात यावा, यासाठी ग्राम पंचायतीला निवेदन दिले होते. परंतु ग्रामपंचायतीने याकडे साफ दुर्लक्ष केले. त्यामुळे पुन्हा चार दिवसांपूर्वी स्थानिक व्यापाऱ्यांनी ग्राम पंचायतीला निवेदन सादर केले असून, येत्या मंगळवारच्या आत ग्राम पंचायतीने स्टॅन्डपासून चर्चपर्यंत बसणाऱ्या व्यापाऱ्यांना बाजारपेठेत बसण्याची सक्ती करावी, अशी मागणी निवेदनात केली आहे. निवेदनावर प्रभाकर बिरजे, खाजासाब डंबलकर, आस्कर डंबलकर, शशिकांत हळब, विनायक किनारी, ओंकार साखळकर आदी व्यापारासह इतर ग्रामस्थांनी सह्या केल्या आहेत.