TT Vaccination: जिल्ह्यातील PHC मध्ये धनुर्वात लसीची टंचाई, वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून अजब सल्ला
टीटी इंजेक्शन हे टिटॅनस जीवाणूच्या विषारी भागापासून (टॉक्सिन) बनवलेले असते
By : कृष्णात चौगले
कोल्हापूर : जिह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये धनुर्वात (टीटी) लसीची टंचाई आहे. रुग्णांना खासगी औषध दुकानातून लस खरेदी करावी लागत आहे. ही लस घ्यायची असेल तर स्वत: उपलब्ध करून द्या, असा सल्ला वैद्यकीय अधिकारी आणि आरोग्य कर्मचाऱ्यांकडून संबंधित रुग्णांना दिला जात आहे. प्रा. आ. केंद्रामध्ये रांगेत उभे राहून वैद्यकीय अधिकाऱ्यांकडे पोहोचल्यानंतर त्यांच्याकडून लस उपलब्ध नसल्याचे सांगितले जाते. त्यामुळे ती बाहेरून खरेदी करण्यासाठी पुन्हा नागरिकांना धावपळ करावी लागत आहे.
मोफत सेवेच्या अपेक्षेने प्रा. आ. केंद्रांमध्ये जाणाऱ्या रुग्णांवर आर्थिक भार पडत आहे. जर कोणाला गंजलेल्या वस्तू, धातू किंवा इतर वस्तूने दुखापत झाली असेल, तर टिटॅनसचा संसर्ग होऊ शकतो. अशा परिस्थितीत टीटी इंजेक्शन घेणे आवश्यक आहे. टीटी इंजेक्शन टिटॅनस रोगापासून (धनुर्वात) संरक्षण करण्यासाठी घेतले जाते. टिटॅनस हा जीवाणूजन्य रोग आहे, जो क्लोस्ट्रिडियम टेटानी या जीवाणूमुळे होतो. या जीवाणूचा संसर्ग झाल्यास स्नायू ताठून जातात. वेदना होतात.
टीटी इंजेक्शन हे टिटॅनस जीवाणूच्या विषारी भागापासून (टॉक्सिन) बनवलेले असते. जे आपल्या शरीरात प्रतिकारशक्ती निर्माण करते आणि टिटॅनसपासून संरक्षण करते. लहान मुलांना आणि गर्भवती मातांना टीटी इंजेक्शनचा डोस दिला जातो, जेणेकरून त्यांना टिटॅनसपासून संरक्षण मिळते. पण जिह्यात या लसीची टंचाई असल्यामुळे रुग्णांना ती खासगी औषध दुकानातून खरेदी करावी लागत आहे. जि. प. चा आरोग्य विभाग मात्र याबाबत अनभिज्ञ आहे.
जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार जून 2024 मध्ये टीटी लस खरेदी केली होती. ती प्राथमिक आरोग्य केंद्रांकडे पुरविली. वर्षभरात या लसीचा वापर होऊन ती संपली. त्यामुळे लस जि. प. च्या आरोग्य विभागाकडून उपलब्ध होईपर्यंत रुग्ण कल्याण समितीकडे असणाऱ्या निधीतून प्राथमिक आरोग्य केंद्रांनी खरेदी करणे अपेक्षित आहे. पण त्याबाबतची कोणतीही कार्यवाही झाली नसल्यामुळे लस घेण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना ती खासगी औषध दुकानातून खरेदी करावी लागत आहे.
लसीसाठी नागरिकांची हेळसांड
सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेतील नियमांनुसार उपचार अथवा एखादी लस घेण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना लस, औषध अथवा इंजेक्शन खासगी औषध दुकानातून आणण्यास सांगणे चुकीचे आहे. तरी आरोग्य कर्मचाऱ्यांकडून औषधाच्या चिट्या देऊन ती खरेदी करण्यास सांगितले जाते. त्यामुळे राज्याच्या आरोग्य मंत्रालयाचा कारभार पाहणाऱ्या मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या जिह्यातच प्राथमिक स्वरुपाच्या लसींसाठी रुग्णांची हेळसांड होत असल्याचे चित्र आहे.
खासगी दुकानातून लस आणण्यास सांगणे चुकीचे
"टीटीची लस घेण्यासाठी आलेल्या नागरिकांना खासगी दुकानातून लस खरेदी करण्यास सांगणे चुकीचे आहे. ही लस प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावरच उपलब्ध करून देणे अपेक्षित आहे. टंचाई असल्यास तातडीने उपाययोजना केल्या जातील."
- अनिरुद्ध पिंपळे, जिल्हा आरोग्य अधिकारी, जि. प. कोल्हापूर
- रुग्णांकडून लस खरेदी खासगी औषध दुकानातून
- आरोग्यमंत्र्यांच्या जिह्यातच रुग्णांची हेळसांड
- जि. प. ने जून 2024 मध्ये खरेदी केली होती लस आरोग्य केंद्रात लस
- नाही तर रांगा का लावून घेतात?