इफ्फी संस्मरणीय करण्यासाठी प्रयत्न सुरू
ईएसजीत सुकाणू समिती बैठकीत नियोजन : मुख्यमंत्र्यांनी सहभागी होऊन केले मार्गदर्शन
पणजी : माहिती आणि प्रसारण सचिव संजय जाजू यांनी काल मंगळवारी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची भेट घेऊन यंदाचा इफ्फी अर्थात भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव अधिक लोककेंद्रित, समावेशक आणि दिमाखदार बनवण्यासाठीच्या धोरणांवर चर्चा केली. महोत्सवाचे संचालक शेखर कपूर, इफ्फीच्या सुकाणू समितीचे सदस्य व माहिती आणि प्रसारण मंत्रालय आणि राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळाचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते. यंदाचा 55 वा इफ्फी महोत्सव सिने जगताचे प्रतिनिधी आणि सर्वसामान्य चित्रपट प्रेमींसाठी संस्मरणीय ठरावा यासाठी व भारतीय सिनेमा आणि सिने प्रतिभेचा उत्सव साजरा करण्यासाठी चैतन्यदायी वातावरण निर्माण करण्यासाठीचे उपाय आणि उपक्रमांवर यावेळी चर्चा झाली. महोत्सवादरम्यान भारतीय चित्रपटाचा गौरव करण्यासाठी विशिष्ट संकल्पनेवरील परेडचे आयोजन, या प्रमुख मुद्यावर यावेळी चर्चा झाली. या दिमाखदार परेड उत्सवाची शोभा वाढवतील आणि स्थानिक समुदायाला सामावून घेतील.
इफ्फीत एक मनोरंजन आर्केड असेल, ज्यामध्ये लोकांच्या सहभागाने भारतीय सिनेमा आणि संस्कृतीचा उत्सव साजरा केला जाईल. या संवादात्मक कार्यक्रमात उपस्थितांना चित्रपट उद्योग आणि भारतीय संस्कृतीच्या विविध पैलूंचा परिचय होईल.सुकाणू समितीचे सदस्य बॉबी बेदी आणि रवी कोट्टरक्कर, माहिती प्रसारण मंत्रालयाचे प्रसारण संयुक्त सचिव आणि एनएफडीसीचे व्यवस्थापकीय संचालक पृथुल कुमार, माहिती प्रसारण मंत्रालयाच्या चित्रपट संयुक्त सचिव वृंदा देसाई, दिग्दर्शिका अनुरिमा शर्मा, ओएसडी फिल्म्सचे श्रीरंग मुकुंदन, ईएसजीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अंकिता मिश्रा आदी मुख्यमंत्र्यांसह बैठकीत सहभागी झाले होते. तत्पूर्वी, संजय जाजू यांनी महोत्सवाच्या स्थळांना भेटी दिल्या आणि संबंधित अधिकाऱ्यांना महोत्सवाच्या तयारीची कामे नियोजित वेळेत पूर्ण करण्याबाबत सूचना केल्या. भारत सरकारच्या वतीने दरवषी 20 ते 28 नोव्हेंबर या कालावधीत गोव्यात इफ्फीचे आयोजन करण्यात येते.