जिल्ह्यात उद्योग आणण्यासाठी प्रयत्नशील !
मंत्री दीपक केसरकर : दांडेली-आरोस बाजार येथे दीपावली शो कार्यक्रम
न्हावेली / वार्ताहर
जिल्ह्यात काजू,बोंडू,नारळ,कोकम यावर प्रक्रिया करणारे उद्योग आणणार आहे. यासाठी रत्नसिंधू योजनेतून निधी उपलब्ध करून अनेक बेरोजगारांच्या हाती रोजगार देणार. सातार्डा उत्तम स्टील ठिकाणी उद्योग आणणार असल्याची ग्वाही, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिली.
जय हनुमान मित्र मंडळ दांडेली-आरोस बाजार येथे दीपावली शो टाईमच्या उद्घाटन प्रसंगी मंत्री केसरकर बोलत होते. व्यासपीठावर शिवसेना तालुकाप्रमुख नारायण राणे, आरोस सरपंच शंकर नाईक, दांडेली सरपंच निलेश आरोलकर, विभाग प्रमुख बाळा शिरसाट, माजी सरपंच संजू पांगम, बाळा मोरजकर, माजी उपसरपंच योगेश नाईक, शाखाप्रमुख तानाजी खोत, ग्रामपंचायत सदस्य प्रफुल्लता मालवणकर, उमा पांगम, उपविभाग प्रमुख राजन नाईक, गजानन नाटेकर, सामाजिक कार्यकर्ते संदीप माणगावकर, सिद्धेश मालवणकर, रसिक दळवी, नाना पेडणेकर, राजन मालवणकर, पोलिस पाटील चतुर मालवणकर आदी उपस्थित होते.
मंत्री केसरकर म्हणाले की, आरोस व दांडेली मधील रस्ते, पुलांसाठी भरघोस निधी देणार. सातार्डा येथील उत्तम स्टील ठिकाणी एखादा नवीन उद्योग आणून युवकांना रोजगार संधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. आरोंदा खाडीच्या आजूबाजूला पर्यटन दृष्ट्या रोजगार निर्माण करणार. जिल्ह्यात होणाऱ्या काजू, बोंडू, नारळ, कोकम यावर प्रक्रिया करणारे उद्योग आणण्यासाठी उद्योग मंत्री उदय सामंत यांच्याशी चर्चा सुरू आहे. या उद्योगांसाठी रत्नसिंधू योजनेतून निधी उपलब्ध करून देणार असल्याची ग्वाही मंत्री केसरकर यांनी दांडेली येथील कार्यक्रमात दिली.