सामंजस्याने समस्या सोडविण्याचे प्रयत्न करा!
ऊस दराचा तिढा सोडविण्याबाबत साखर मंत्री शिवानंद पाटील यांचे शेतकऱ्यांना आवाहन
बेंगळूर : ऊस दर निश्चित करण्यात केंद्र सरकारची भूमिकाच महत्त्वाची आहे. राज्य सरकार केवळ मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करेल. त्यामुळे शेतकऱ्यांनी संघर्ष करण्याऐवजी सामंजस्याने समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन साखर आणि कृषी बाजारपेठ मंत्री शिवानंद पाटील यांनी केले. केंद्र सरकारने उसासाठी निश्चित केलेला दर देण्यासाठी राज्य सरकार प्रामाणिक प्रयत्न करेल. जिल्हाधिकाऱ्यांच्या मध्यस्थीने शेतकरी व साखर कारखानदारांची बैठक यापूर्वीच घेतली आहे. मात्र, बेळगाव व बागलकोट जिल्ह्यात काहीसा गोंधळ निर्माण झाला आहे. ही समस्या चार भिंतीच्या आत बसून सोडवावी. रस्त्यावर उतरून नव्हे, असे त्यांनी पत्रकारांच्या एका प्रश्नावर उत्तर देताना सांगितले.
दक्षिण कर्नाटकात ऊस गाळपाला नुकताच प्रारंभ झाला आहे. बागलकोट जिल्ह्यातील कारखाने सुरू होत आहेत. बेळगावमध्ये जिल्हाधिकाऱ्यांच्या मध्यस्थीने पार पडलेली बैठक एका टप्प्यापर्यंत पोहोचली होती. तथापि, काही नेत्यांनी जास्त दर देण्याचे आश्वासन दिल्याने शेतकऱ्यांनी हाच मुद्दा उचलून धरला आहे. शेतकऱ्यांनी उसाला प्रतिटन 3,400 रु. देण्याची मागणी केली आहे, तर साखर कारखान्यांनी 3,200 रु. देण्याचे आश्वासन दिले आहे. त्यामुळे तडजोडीच्या सूत्राने ही समस्या सोडवावी. अन्यथा विलंब झाला तर उत्पादनावर परिणाम होईल. त्यामुळे त्यांनी सहकार्य करावे, अशी विनंती त्यांनी केली.
शेतकरी-कारखान्यांचे हित महत्त्वाचे
साखर कारखाने व शेतकरी दोघांचेही हित महत्त्वाचे आहे. शेतकरी आपले प्रथम प्राधान्य असले तरी कारखान्यांची स्थिती, केंद्र सरकारचे धोरण आणि सध्याची बाजारपेठ व्यवस्था या बाबी देखील लक्षात ठेवल्या पाहिजे. शेतकरी आणि कारखान्यांचे मालकांनी परस्पर सहकार्य भावनेने दर निश्चित करावा, असे आवाहन त्यांनी केले.