गुन्हा घडूच नये, यासाठी प्रयत्न करा!
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचा महिला पोलिसांना सल्ला
पणजी : राज्यात महिलांबाबत होणाऱ्या गुह्यांचा तपास लावला जात असला तरीही गुन्हा घडल्यानंतर तपास लावण्यापेक्षा गुन्हे घडूच नयेत यासाठी काम करणे फार महत्त्वाचे आहे, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सांवत यांनी सांगितले. महिला पोलिसांनी मुलांमध्ये जागऊकता वाढविण्यासाठी शाळांना भेट देऊन जनजागृती करावी. तसेच पोलीस स्थानकांमध्ये समुपदेशन सेवा सुरू करावी. स्थानिक सरपंच, पंच आणि इतरांनी सक्रियपणे पोलिसांना सहकार्य करावे, असेही मुख्यमंत्री म्हणले. राज्यात काल गुरुवारपासून नवरात्रोत्सव सुरू झाला आहे. या उत्सवात महिलांना विशेष महत्त्व आहे म्हणून मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गोवा पोलीस मुख्यालयात, पोलीस महासंचालक आलोक कुमार, आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत महिला पोलीस कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. त्यानंतर मुख्यमंत्री पत्रकारांशी बोलत होते. या बैठकीत महिला पोलिस कर्मचाऱ्यांची फौजदारी प्रकरणे सोडविणे, महिलांबाबत होणारे गुन्हे कसे कमी करता येईल याबाबत चर्चा करण्यात आली असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. प्रा. सुभाष वेलिंगकर यांच्या विरोधात दाखल केलेल्या तक्रारीबाबत विचारले असता मुख्यमंत्र्यांनी बोलण्याचे टाळले.